पंचकुला : स्वच्छ प्रतिमा आणि आपल्या संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखले जाणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी हरियाणाचे पहिले भाजपा मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. खट्टर यांच्यासोबत त्यांच्या सहा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचाही शपथविधी यावेळी पार पडला. या शपथविधीबरोबर ४८ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भाजपाचे पहिले सरकार हरियाणात सत्तारूढ झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्री या दहा सदस्यीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राज्यपाल कप्तानसिंग सोळंकी यांनी या सर्वांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले खट्टर हे गेल्या चार दशकांपासूनच रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आणि भाजपाचे सदस्य राहिलेले आहेत. ते हरियाणाचे पहिले पंजाबी आणि १८ वर्षांतील पाचवे बिगर जाट मुख्यमंत्री आहेत. खट्टर यांच्यासमवेत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये प्रदेश भाजपा अध्यक्ष रामविलास शर्मा, अभिमन्यू, ओमप्रकाश धनकड, कविता जैन, अनिल विज आणि नरबीर सिंग यांचा समावेश आहे, तर विक्रम सिंग ठेकेदार, कृष्णकुमार बेदी आणि करणदेव कम्बोज यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. भारालोदच्या वतीने अभय चौटाला, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हेही शपथविधीला हजर झाले होते. (वृत्तसंस्था)
हरियाणामध्ये खट्टर मंत्रिमंडळ सत्तारूढ
By admin | Updated: October 27, 2014 01:42 IST