चिखली : चौपदरीकरणाच्या दुष्टच्रकात अडकलेला व मृत्यूचा सापळा बनलेल्या जालना-खामगाव महामार्गाने आणखी दोन बळी घेतले असून भावाच्या लग्न पत्रिका वाटून चिखली येथून देऊळगावराजाकडे दुचाकीने निघालेल्या दोन युवकांना खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सने दिलेल्या जबर धडकेत एक जण जागीच ठार तर एकास गंभीर अवस्थेत औरंगाबादकडे उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना ११ मे रोजी शहरापासून जवळच असलेल्या भानखेड फाट्याजवळ सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर असे की, जाफ्राबाद तालुक्यातील वरूड येथील रहिवासी अनंथा साळुबा काळे वय २९ वर्षे याच्या भावाचे १५ मे रोजी लग्न असल्याने तो त्याचा चुलत भाऊ योगेश अंबादास काळे याच्यासह चिखली शहरातील आपल्या नातेवाईकांकडे लग्नपत्रीका वाटण्यासाठी हिरो होंडा पॅशन प्रो क्रमांक एम.एच.२८ यू ६७७४ ने आला होता. लग्नपत्रीका वाटून झाल्यानंतर चिखलीवरून देऊळगावराजाकडे जात असताना शहरापासून जवळच असलेल्या भानखेड फाटानजिक विरूध्द दिशेने येणार्या चिंतामणी ट्रॅव्हल्स क्रमांक एम.एच.२९ टी.७२७३ मुंबई-बुलडाणा या गाडीचे ॲक्सल तुटल्याने गाडी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व समोरून येणार्या दुचाकीस ट्रॅव्हल्सने जबर धडक दिली. या भिषण अपघातात दुचाकीवरील अनंथा काळे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर योगेश काळे यास गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी औरंगाबादकडे नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. अपघातानंतर रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक शाखेचे पीएसआय भोई, नेमणार, पाटील, बनसोडे, नागरे, लोंढे यांनी तातडीने उपाययोजना पुरवून वाहतूक सुरळीत केली. अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी दाखल झालेल्या मनसेचे प्रदिप भवर, पंकज सुरडकर, दत्ता सुरडकर यांनी अपघातातील जखमी व मृतकाला ग्रामीण रूग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. याप्रकरणी सखराम संपत शेळके रा.वरूड ता.जाफ्राबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून अपघातास कारणीभूत ट्रॅव्हल्स चालकाला अटक केली आहे.
** संतप्त जमावाची गाडीवर दगडफेकगत अनेक वर्षापासून रखडलेल्या जालना-खामगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे या रस्त्यांची अत्यंत दूरावस्था असून अपघातांची मालीका सुरूच आहे. यामुळे नागरीकांमध्ये प्रचंड रोष असून अशातच रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे आणखी दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त कळताच परिसरातील नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेतली. घटनास्थळी जमा झालेल्या संतप्त जमावाने आपला रोष व्यक्त करीत गाडीवर दगडफेक केली व काचा फोडल्या तर काहींनी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोहचलेल्या पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन करून पुढील परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.