ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि, १३ - अरविंद केजरीवाल हे चांगले नेते असले तरीही त्यांच्याकडे संघटनकौशल्याचा अभाव आहे, अशी टीका करत 'आप'चे नेते शांतीभूषण यांनी केजरीवालांना घरचा आहेर दिला आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव, पक्षाच्या अनेक नेत्यांनी सोडलेली साथ यामुळे 'आम आदमी पक्ष' खिळखिळा झालेला असतानाच आता पक्षाच्या सदस्यांनीच केजरीवालांविरोधात सूर आळवणे सुरू केले आहे. पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत केजरीवाल इतरांना सामील करून घेत नाहीत, असा आरोप भूषण यांनी केला आहे. केजरीवाल यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावर पक्ष सांभाळण्याची कुवत नसल्याचेही सांगत त्यांनी पक्ष बांधणीची धुरा आता इतरांकडे सोपवावी असेही ते म्हणाले.
'आम आदमी पक्षातील' मार्गदर्शक समजले जाणारे शांती भूषण हे पक्षाच्या स्थापनेपासून अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय समजले जातात. केजरीवाल हे हुशार, बुद्धिमान नेते आणि उत्तम व्यूहरचनाकार असले तरीही एक संस्था चालवण्यासाठी लागणा-या कौशल्यांचा त्यांच्याकडे अभाव असल्याचे मत त्यांनी नोंदवले. मात्र असे असले तरीही 'आप'चा प्रमुख चेहरा म्हणून तेच योग्य असल्याचे व यापुढेही त्यांनीच कायम रहावे असेही ते म्हणाले.
केजरीवाल यांच्या नेतृत्वाबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भूषण हे काही पहिले नेते नाहीत, यापूर्वीही पक्षातील ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव, शाझिया इल्मी यांनी पक्षप्रमुख केजरीवालांविरोधात आवाज उठवत पक्षांतर्गत लोकशाही नसल्याची तक्रार नोंदवली होती. लोकसभा निवडणुकीत गाझियाबाद येथथून पराभूत झाल्यावर इल्मी यांनी तर पक्षाचा राजीनामाही दिला होता. पक्षातील महत्वाचे निर्णय फक्त काही मोजकेच नेते घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.