फुटलेली युती आणि बिघडलेली आघाडी यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये होणाऱ्या किमान पंचरंगी लढती हे या निवडणुकीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. यामुळे विजयाचे गणित मात्र काहीसे अवघड बनलेले दिसते. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे १५ मतदारसंघ आहेत. सध्याच्या विधानसभेत शिवसेनेचे चार, मनसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रत्येकी तीन, कॉँग्रेसचे दोन, भाजपा, अपक्ष आणि जनसुराज्य पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. विद्यमान आमदारांपैकी तिघे यावेळच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी करीत नाहीत. त्यामध्ये बबन घोलप, उत्तमराव ढिकले आणि उमाजी बोरसे यांचा समावेश आहे.कळवण मतदारसंघातून सात वेळा विधानसभेत जाणारे ए. टी. पवार हे पुन्हा एकदा राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवित आहेत. पाणीप्रश्न सोडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे; मात्र सुरगाणा तालुक्याकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याची तक्रार आहे. माजी आमदार जे. पी. गावित हे पवार यांच्या विरोधात मैदानात आहेत. नाशिकमधून मागील वेळी मनसेला तीन जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र या जागा राखणे या पक्षाला जड जाणार असल्याची चिन्हे आहेत. देवळाली मतदारसंघामधून बबन घोलप यांचे पुत्र योगेश घोलप हे शिवसेनेकडून निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांचे उमेदवार आहेत. इगतपुरीमध्ये विद्यमान आमदार निर्मला गावित यांना राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आणि मनसेने आव्हान दिले आहे. गावित यांच्याबाबत असलेली नाराजी त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते. दिंडोरीमध्ये विद्यमान आमदारांना दोन माजी आमदारांचा मुकाबला करावा लागणार आहे, तर बागलाणमध्ये भाजपाच्या दिलीप बोरसे यांना आव्हान मिळत आहे.
पंचरंगी लढतींमध्ये विजयाचे गणित बनले अवघड
By admin | Updated: October 6, 2014 04:27 IST