प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या स्नानादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. डीआयजी वैभव कृष्ण यांच्या मते, मृतांपैकी २५ जणांची ओळख पटली आहे.तर दुसरीकृ़डे मृतांचे नातेवाईक अजूनही मोतीलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागाराजवळ उपस्थित आहेत.
या दुर्घटनेत उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील दोन महिलांचाही मृत्यू झाला. ज्यांचे कुटुंबीय अजूनही मृतदेह मिळण्याची वाट पाहत आहेत. जौनपूर येथील रहिवासी जगवंती देवी आपल्या कुटुंबासह मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी आल्या होत्या. पण या चेंगराचेंगरीत जगवंती देवींनी त्यांची वहिनी आणि आई गमावली.
जगवंती देवी म्हणाल्या की, जेव्हा ही दुर्घटना झाली तेव्हा आमच्या वहिनी म्हणाल्या - माझ्या मुलीला वाचवा. कोणीतरी माझ्या ७ वर्षांच्या भाचीला बाहेर फेकून दिलं आणि ती बांबूच्या बॅरिकेडला धरून बराच वेळ त्यावर लटकून राहिली. तेव्हाच तिचा जीव वाचला. पण आमच्या वहिनी आणि आईला वाचवता आलं नाही.
जगवंती देवीची भाची म्हणाली, "मीही ओरडत होते मला वाचवा... मला वाचवा... पण कोणीही मला वाचवत नव्हतं." मंगळवारी रात्री उशिरा महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३० जणांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले.
महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दिवसभर गंगा आणि संगमच्या काठावर भाविकांची गर्दी सुरूच होती. मेळा प्रशासनाच्या मते, मौनी अमावस्येच्या निमित्ताने बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत ७.६४ कोटी लोकांनी स्नान केले.