एसेक्स : ब्रिटनमधील ऐसेक्स काऊंटीच्या टिलबरी बंदरात जहाजातून उतरविण्यात आलेल्या एका कंटेनरमध्ये शनिवारी 35 लोक आढळून आले. यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर उर्वरितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे लोक भारतीय वंशाचे असल्याचे सांगण्यात येते. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. हे बंदर लंडनचे प्रमुख बंदर म्हणून ओळखले जाते.
हे लोक बेकायदेशीररीत्या स्थलांतर करीत असण्याची शक्यता आहे. जहाजातून सकाळी कंटेनर उतरवून घेण्यात येत असताना एका कंटेनरमध्ये महिला, पुरुषांसह मुले असल्याचे आढळून आले. यातील अनेकांची प्रकृती ढासळलेली असल्यामुळे सात रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी बोलाविण्यात आल्या. या 34 जणांपैकी सात मुले आहेत. (वृत्तसंस्था)