कट्टणकुलथूर : इ.स. २०४० पर्यंत भारत आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर पाठवून यशस्वीरीत्या परत आणेल, असा विश्वास भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) चेअरमन डॉ. व्ही. नारायणन यांनी व्यक्त केला आहे. 'एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी'च्या (एसआरएमआयएसटी) चेन्नईमधील कट्टणकुलथूर कॅम्पसमध्ये झालेल्या २१ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
अंतरिक्ष विभागाचे सचिव आणि इस्रोचे चेअरमन डॉ. व्ही. नारायणन यांच्यासह भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स'ने सन्मानित करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी 'एसआरएमआयएसटी'चे संस्थापक कुलपती डॉ. टी. आर. पारिवेंधर हे होते. या वर्षी एकूण ९,७६९ पदव्या प्रदान करण्यात आल्या.