जयशंकर गुप्त, नवी दिल्लीदेशात उच्चशिक्षण घेतलेले किती पदवीधर आहेत, याची आकडेवारी मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे नाही, असे मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे खा. विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.उच्च शिक्षण पद्धतीनुसार दरवर्षी ४ लाख ५० हजार इंजिनीअर आणि सर्व विषयांचे ३७ लाख पदवीधर तयार होतात. मात्र आमचे मंत्रालय बेरोजगार पदवीधरांची आकडेवारी ठेवत नाही, असे इराणी यांनी लेखी उत्तरात नमूद केले. देशात उच्च शिक्षण व्यवस्थेनुसार ३ लाख ५० हजार इंजिनीअर आणि २५ लाख पदवीधर दरवर्षी मनुष्यबळात योगदान देतात; पण तरीही ५० लाख पदवीधर बेरोजगार राहतात, याकडे खा. दर्डा यांनी लक्ष वेधले. विद्यापीठांना उद्योगजगताच्या आवश्यकतेनुसार अभ्यासक्रम तयार करण्यासह शिक्षणाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी प्रोत्साहित करणार काय? असा प्रश्नही त्यांनी विचारला. विद्यापीठ आयोग सामुदायिक महाविद्यालय तसेच बी.वॉक. पदवी या दोन योजनांवर काम करीत आहे. त्यानुसार अभ्यासक्रम तयार करणे, अभ्यासक्रमांचे मूल्यांकन तसेच निष्पत्तीत उद्योगाची भागीदारी निश्चित केली जाते. उद्योगाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण आणि उद्योगस्थळी शिक्षणाची तरतूद केली जात आहे. विशेष व्यापार क्षेत्राकरिता व्यावसायिक घटकांसाठी अभ्यासक्रमात ६० टक्के वाटा असतो. उद्योग सहभागासह योग्य कार्यस्थळाचे वातावरण उपलब्ध करवून देण्याचा त्यामागे उद्देश असतो. उद्योगाची गरज आणि पदवी नियोजन वाढीचे प्रमाण लक्षात घेता, अ.भा. तांत्रिक शिक्षण परिषदेने पदवीस्तरावर व्यवस्थापन, फार्मसी, वास्तुकला, शहर योजना अभ्यासक्रम आणि पदवीस्तरावर इंजिनीअर अभ्यासक्रमासाठी मॉडेल अभ्यासक्रम तयार केला आहे. अन्य अभ्यासक्रमासाठी मॉडेल ठरविण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
देशात बेरोजगार इंजिनीअर किती?
By admin | Updated: August 12, 2014 01:52 IST