नवी दिल्ली : गेल्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरी लक्षात घेता ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून असलेली मान्यता रद्द का करू नये?, अशी ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या तीन राजकीय पक्षांची बाजू निवडणूक आयोग येत्या आठवड्यात ऐकून घेणार आहे.ही माहिती देताना कायदामंत्री रवी शंकर प्रसाद यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस व कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता कायम राखण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता करीत नसल्याने त्यांच्या ‘राष्ट्रीय दर्जा’विषयी फेरविचार केला जात असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.आयोग या तिन्ही पक्षांना आपापले म्हणणे मांडण्याची संधी येत्या १९ आॅगस्ट रोजी देणार असून सुनावणीनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे कायदामंत्र्यांनी एका लेखी उत्तरात सांगितले. या पक्षांखेरीज काँग्रेस, भारतीय जनता पार्टी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेले इतर तीन राजकीय पक्ष आहेत.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय दर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी
By admin | Updated: August 12, 2014 02:31 IST