पत्नीला पाच वर्षे सश्रम कारावास
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
हायकोर्ट : पतीची चाकू भोसकून हत्या
पत्नीला पाच वर्षे सश्रम कारावास
हायकोर्ट : पतीची चाकू भोसकून हत्यानागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पतीची चाकू भोसकून हत्या करणाऱ्या पत्नीला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.ताराबाई सुधाकर चव्हाण (४०) असे आरोपीचे नाव असून ती आंबेडकर कॉलनी, कामठी रोड येथील रहिवासी आहे. ताराबाईला सुधाकरचे त्याच्या मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. १९ नोव्हेंबर २०११ रोजी रात्री सुधाकर संबंधित महिलेच्या घरी असताना ताराबाई तेथे गेली. दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. दरम्यान, ताराबाईने सुधाकरच्या छातीत चाकू भोसकला. यामुळे सुधाकर ठार झाला.११ जुलै २०१२ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत आजन्म कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून आरोपीला कलम ३०२ ऐवजी ३०४-२ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पाचपावली पोलिसांनी घटनेचा तपास केला होता. आरोपीतर्फे ॲड. राजेंद्र डागा तर, शासनातर्फे एपीपी एम. एच. देशमुख यांनी बाजू मांडली.