नवी दिल्ली : भारतीयांनी परदेशात नेऊन दडवून ठेवलेला काळा पैसा हुडकून काढून तो पुन्हा देशात आणण्याची पावले उचलण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने नेमलेल्या उच्चाधिकारप्राप्त विशेष तपासी दलाची (एसआयटी) पहिली बैठक उद्या सोमवारी होणार आहे़ सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या़ एम़बी़ शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल़ एसआयटीचे उपाध्यक्ष न्या़ (सेवानिवृत्त) अरिजित पसायत तसेच ११ उच्चस्तरीय तपास संस्था व विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला हजर असतील़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत प्रामुख्याने काळ्या पैशाशी निपटण्याचे धोरण, तपासाची सद्य:स्थिती तसेच सर्व विभागांकडे यासंदर्भात उपलब्ध तपशिलावर विचार केला जाईल़ बैठकीत भाग घेणार्या सर्व विभागांना त्यांच्याद्वारे सुरू असलेल्या चौकशीचा स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गत २७ मे रोजी मोदी सरकारने आपल्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसआयटी नेमण्याचा निर्णय घेतला होता़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
काळ्या पैशावर आज पहिली बैठक
By admin | Updated: June 2, 2014 06:14 IST