पणजी : गोव्यातील प्रत्येक गाव आणि वस्तीवर एचआयव्हीग्रस्त रुग्ण आढळले असल्याची धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी विधानसभेत दिली.नव्यानेच एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता कमी होत असल्याचे आढळून येत आहे. २००३ साली एचआयव्हीची लागण झालेले अकराशे नवे रुग्ण सापडले होते. मात्र त्यानंतर नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत गेले. गेल्यावर्षी एचआयव्हीचे सुमारे साडेपाचशे नवे रुग्ण सापडले. राज्यात एचआयव्हीबाधित रुग्ण नाही, असे एकही गाव किंवा वस्ती नाही, असेही पार्सेकर यांनी नमूद केले. एकमेकांच्या केवळ सहवासातून एचआयव्हीची लागण होते, असा अत्यंत चुकीचा समज काही लोकांमध्ये आहे. एचआयव्हीची लागण होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत शासकीय यंत्रणा जनजागृती करत आहे, असेही त्यांनी सांगितले. आमदार निलेश काब्राल यांनी एचआयव्ही, कॅन्सर व क्षयरोगग्रस्त रुग्णांबाबत प्रश्न विचारला होता. (विशेष प्रतिनिधी)
गोव्यात प्रत्येक गाव, वस्ती एचआयव्हीग्रस्त!
By admin | Updated: August 12, 2014 01:48 IST