कोल्हापूर : जगभरातील संशोधकांना भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाबद्दल खूप उत्सुकता आहे. दुर्दैवाने १९६४ साली जेव्हा चित्रपट संग्रहालयाची स्थापना झाली, तोपर्यंत ९० टक्के चित्रपट नष्ट झाले होते. ही चूक सुधारत संग्रहालयाच्या वतीने नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनची स्थापना केली असून, या अंतर्गत दुर्मीळ व जुन्या चित्रपटांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. शाहू स्मारक भवनात कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त बुधवारी कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीतर्फे अभिनेता हृषिकेश जोशी लिखित ‘नांदी आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, अभिनेत्री मुग्धा गोडबोले, विजयमाला मेस्त्री, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कार्यवाह सुभाष भुरके, प्रकाशक शैलेश नांदुरकर उपस्थित होते. मगदूम म्हणाले, ब्रिटिशांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीचा इतिहास खूप चांगल्या पद्धतीने संवर्धित केला आहे. भारतातील सिनेसृष्टीचा इतिहास खूप रंजक आहे; पण तो जतन करण्याचे काम कोण करणार हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ची स्थापना केली असून, त्यासाठी ६०० कोटींची तरतूद केली आहे. मूकपटांपासून बोलपटांपर्यंतच्या अनेक दुर्मीळ चित्रपटांचे, लघुपटांचे किंवा चित्रीकरणाच्या फुटेजचे डिजिटलायझेशन केले जाईल. आमच्या प्रयत्नांना यश येऊन काही दिवसांपूर्वी आम्ही दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ आणि ‘कालियामर्दन’ या दोन चित्रपटांचे डिजिटलायझेशन केले आहे. हृषिकेश जोशी म्हणाले, मराठी नाटकांच्या इतिहासाच्या संशोधनाचे फलित म्हणून २००५ मध्ये ‘नांदी’ नाटकाच्या संहितेचे लेखन झाले. ते २०१३ साली रंगमंचावर आले. त्याचे शंभर प्रयोग झाले. यावेळी प्रकाशक शैलेश नांदूरकर यांनी ‘नांदी’ची दुसरी आवृत्ती प्रकाशित करणार असल्याचे जाहीर केले. फिल्म साोसायटीचेअध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी प्रास्ताविकात कलामहर्षींच्या कार्याचा आढावा घेतला. कोल्हापूर हे सगळ्या कलाशाखांचा एक प्रवाह आहे. तो प्रवाहित ठेवण्याचे आणि इतिहासाचे जतन करण्याची जबाबदारी नव्या पिढीची आहे. ऐश्वर्या बेहरे यांनी सूत्रसंचालन केले. यानंतर गजेंद्र अहिरे यांनी ‘ए दिले नादान’ या लघुपटाची माहिती सांगितली. त्यानंतर रवी जाधव दिग्दर्शित ‘मित्र’ व ‘ए दिले नादान’ या लघुपटांचे प्रदर्शन झाले. (प्रतिनिधी)‘नांदी आणि मी’तून इतिहासाची पुनर्मांडणीयावेळी नाटककार हिमांशू स्मार्त यांनी ‘नांदी आणि मी’ या पुस्तकावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘नांदी’ हे नाटक आणि पुस्तक दोन्हीही मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासाचे प्रमुख दस्तऐवज आहे. ते रंगभूमीच्या वेगवेगळ्या प्रवाहांना एकसंधतेने बांधून ठेवते. नाटकांच्या वेगवेगळ्या रूपांची मांडणी करते. ‘नांदी’ हे नाटक काही इतिहासाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प नाही; पण इतिहासाच्या पुनर्मांडणीचा सर्जनात्मक प्रकल्प आहे.पोस्टर्स प्रदर्शन... सुरेख नेपथ्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाहू स्मारक भवनाच्या आवारात कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी निर्माण केलेल्या विविध चित्रपटांतील दृश्ये डिजिटलच्या रूपाने प्रदर्शित करण्यात आली. ही छायाचित्रे पाहताना काही क्षण रसिक त्या काळात हरवून जातो; तर रंगमंच सुरेख नेपथ्याने सजविण्यात आले होते. पांढऱ्या स्क्रीनवर बाबूराव पेंटर यांनी चित्रपटांसाठी निर्माण केलेल्या सुरेख पडद्यांचे स्लाईड्स दाखविण्यात येत होते.
नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनची स्थापना
By admin | Updated: June 4, 2015 00:45 IST