बंडखोरीचे ग्रहण
By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST
जि. पं. निवडणूक : शेवटच्या दिवशी 120 अर्ज
बंडखोरीचे ग्रहण
जि. पं. निवडणूक : शेवटच्या दिवशी 120 अर्जपणजी : येत्या 18 रोजी होत असलेल्या जिल्हा पंचायतींच्या 50 मतदारसंघांसाठीच्या निवडणुकीसाठी शनिवारी शेवटच्या दिवशी 120 उमेदवारी अर्ज सादर झाले. यामुळे आता उमेदवारी अर्जांची एकूण संख्या 326 झाली आहे. विविध मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले असल्याचे दिसून येत आहे.सर्व उमेदवारी अर्जांची रविवारी छाननी होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. त्या वेळी कितीजण उमेदवारी मागे घेतात, याकडे लक्ष लागून आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून उमेदवारी सादर केली आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील अनेक जिल्हा पंचायत मतदारसंघांत भाजपचे कार्यकर्ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे ठाकले आहेत. सत्तरी, सांगे, केपे, डिचोली अशा तालुक्यांमध्ये बंडखोरांची मने वळविण्याचा प्रयत्न भाजपच्या काही आमदारांनी व नेत्यांनी चालवला आहे. काही कार्यकर्ते उमेदवारी मागे घेण्यास तयार नाहीत.नेते व आमदारांचा संपर्क चुकविण्यासाठी काहीजणांनी मोबाईलही बंद करून ठेवले आहेत. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी उघडपणे, तर काहीजणांनी छुप्या पद्धतीने बंडखोरी चालवली आहे. बंडखोरांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी भाजपचे काही मंत्री, पदाधिकारी व आमदार यांनी खूप प्रयत्न चालविले आहेत. मतविभाजन टाळण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. काँग्रेसच्याही काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. भाजपची उमेदवार निवड प्रक्रिया ही पारदर्शक राहिली नाही. आम्ही पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून देखील तिकीट वाटपावेळी आम्हाला डावलले गेले, आमच्याशी सल्लामसलत देखील केली गेली नाही, अशी खंत काही कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.काहीजणांनी पक्षाचे अध्यक्ष विनय तेंडुलकर तसेच संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनाही आपल्या भावना कळविल्या आहेत. र्पीकर गेले तीन दिवस गोव्यात आहेत. काही मतदारसंघांत मगोच्या कार्यकर्त्यांमध्येही कुरबुरी सुरू आहेत. काँग्रेसच्याही काही आमदारांना स्वत:च्या बंडखोर कार्यकर्त्यांपासून त्रास होत आहे. मोठय़ा संख्येने अपक्ष उमेदवार सध्या रिंगणात आहेत. (खास प्रतिनिधी)