Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील प्रचार शिगेला पोहोचले आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी पटपरगंजमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह आम आदमी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. 'आरएसएस आणि भाजप भावाभावात भांडण लावतात, तर अरविंद केजरीवाल जे मनात येईल ते बोलतात. राजकारणात आल्यावर त्यांच्याकडे एक छोटी गाडी होती, आता ते एका आलिशाय शीशमहलमध्ये राहतात,' अशी टीका राहुल गांधींनी केली
भाजपवर टीकाराहुल गांधी पुढे म्हणतात, 'मला द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडायचे आहे. आम्हाला द्वेषाचा भारत नकोय. आम्हाला प्रेमाचे दुकान हवे आहे. आमचा लढा संविधानासाठी आहे. 400 पार केल्यानंतर संविधान बदलू, असे भाजपने स्पष्टपणे सांगितले होते. या देशाचे संविधान सर्वांना समान मानते. या देशात कोणी घाबरू नये, असे संविधानात लिहिले आहे. भाजपवाले संविधान मानत नाहीत. या लोकांना एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवायचे आहे. त्यांना तुमचे पैसे तुमच्या खिशातून काढून अब्जाधीशांना द्यायचे आहेत.'
'राम मंदिराच्या उद्घाटनात एकही गरीब दिसणार नाही. आपल्या राष्ट्रपती आदिवासी आहेत, त्यांनाही तिथे जाऊ दिले नाही. नवीन संसदेचे उद्घाटन झाले, तेव्हाही राष्ट्रपतींना बोलावले नाही. देशातील सर्व जनता समान असल्याचे संविधान सांगते. कोणीही कमी नाही, कोणी मोठा किंवा लहान नाही. भारतातील सर्व नागरिक समान आहेत. मोदींना भारताची संपत्ती अब्जाधीशांच्या हाती सोपवायची आहे. तुमच्या खिशातून पैसे काढून अब्जाधीशांना द्यायचे आहेत. अदानी हे पंतप्रधान मोदींचे खास मित्र आहेत,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली..