सद्गुरू पाटील - पणजी
केरळमध्ये दारूबंदी लागू करण्याचे केरळ सरकारने ठरविलेले असले तरी गोव्यात दारूबंदी लागू करता येणार नाही; कारण दारू पिणो ही गोव्याची संस्कृती आहे, असे धक्कादायक विधान भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी शुक्रवारी केले.
प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत मिस्किता यांनी हे विधान केले. केरळमध्ये दारूबंदी लागू करण्याचा निर्णय झाला आहे, गोव्यातही तसे व्हावे असे वाटते काय, असे पत्रकारांनी विचारले. त्यावर मिस्किता म्हणाले, गोव्यात तसे मुळीच करता येणार नाही व तसे कुणी करूही नये; कारण दारू ही गोव्याची संस्कृती आहे. दारू पिणो ही संस्कृती झालेली आहे. स्वागत समारंभ, लग्न समारंभ आणि अन्य तत्सम सोहळ्याच्या निमित्ताने मद्यपान केले जाते. त्यामुळे गोव्यात दारूबंदी लागू करण्याचा विचार करता येत नाही.
श्रीराम सेनेविषयी मिस्किता म्हणाले की, श्रीराम सेनेवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी काही जण करीत आहेत. मात्र, कायमस्वरूपी एखाद्या संघटनेवर बंदी घालण्याची तरतूद कोणत्या कायद्यात आहे ते काँग्रेसचे खासदार शांताराम नाईक यांनी दाखवून द्यावे. असा कायदाच नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुस्लीम लीग अशा संघटनांवरही यापूर्वी काही काळासाठी बंदी घातली होती, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.