नवी दिल्ली : बळजबरीच्या धर्मांतर मुद्यावरील गोंधळामुळे सोमवारी सलग सहाव्या दिवशीही राज्यसभेत कोणतेही कामकाज होऊ शकले नाही़ धर्मांतराच्या मुद्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे, या मागणीसह काळा पैसा आणि रोजगार उपलब्धतेच्या मुद्यावर विरोधकांनी राज्यसभेचे आजचे कामकाज हाणून पाडले़लोकसभेतही विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज चारवेळा स्थगित करण्यात आले़ यानंतर काँग्रेस, डावे पक्ष, सपा, जदयू, तृणमूल काँगे्रस आदी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सभात्याग केला.राज्यसभेत सत्तेत येण्यापूर्वी सत्तारूढ भाजपाने देशातील जनतेला पाच कोटी लोकांना रोजगार देऊ, विदेशातील काळा पैसा परत आणू, अशी अनेक आश्वासने दिली होती़ मात्र सत्तेत येताच, या आश्वासनांची पूर्ती करण्याऐवजी भाजपाप्रणीत सरकारने ‘घर वापसी’ कार्यक्रमाचा धडाका सुरू केला, असा आरोप करीत राज्यसभेत काँगे्रस, समाजवादी पक्ष, जदयू, तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घातला़ तसेच नियम २६६ अंतर्गत कार्यस्थगन प्रस्ताव दिला़ तथापि सभागृहाचे नेते व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या प्रस्तावावर चर्चा करण्यास नकार दिला़ या मुद्यांवर याच अधिवेशनात चर्चा झाली आहे़ त्यामुळे एकाच मुद्यावर दुसऱ्यांदा चर्चा होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले़यामुळे विरोधक संतापले़ याचदरम्यान सपा व जदयू सदस्यांनी हातात पोस्टर घेत, जोरदार घोषणाबाजी केली़ या गोंधळामुळे चार वेळेच्या स्थगितीनंतर अखेर राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले़(लोकमत न्यूज नेटवर्क)
धर्मांतर, काळ्या पैशावरून गोंधळ
By admin | Updated: December 23, 2014 00:48 IST