ऑनलाइन टीम
बान(जर्मनी), दि. १ - भारताची सार्वजनिक प्रसारण संस्था प्रसारभारतीने आता सीमोल्लोंघन करत थेट सातासमुद्रापार विस्तार करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. प्रसारभारतीचे सीईओ जवाहर सरकार यांनी युरोपमध्ये प्रसारभारतीचा विस्तार करण्याचे संकेत दिले असून युरोपमधील ख्यातनाम प्रसारण संस्थांच्या मदतीने विस्तारीकरणाचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
दुरदर्शन, दुरदर्शन न्यूज आणि आकाशवाणी या माध्यमांना सरकारी नियंत्रणापासून मुक्त ठेवण्यासाठी प्रसारभारती या स्वायत्त संस्थेची स्थापना झाली. मात्र खासगी एफएम आणि मनोरंजन वाहिन्यांच्या स्पर्धेत प्रसारभारतीची पिछेहाट झाली. प्रसारभारतीने आता सातासमुद्रापार भरारी घेण्याची तयारी सुरु केले आहे. प्रसारभारतीच्या भविष्यातील वाटचालीविषयी सीईओ जवाहन सरकार यांनी माहिती दिली. सरकार म्हणाले, पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालो आहोत. आता प्रसारभारतीने परदेशातील सर्वोत्तम प्रसारण संस्थांसोबत करार करुन परदेशातही विस्तार केला पाहिजे. यामुळे प्रसारभारती आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीयांचा आवाज बनू शकेल.
सरकार सध्या ग्लोबल मिडीया फोरमसाठी जर्मनीतील बान शहरात आहेत. युरोपमध्ये विस्तारीकरणाचे प्रयत्न यशस्वी होतील का ते बघू असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.