नक्षलग्रस्त भागात निम्म्या पोलीस ठाण्यांचा कारभार प्रभारींवर
By admin | Updated: August 3, 2015 22:31 IST
दिगांबर जवादे
नक्षलग्रस्त भागात निम्म्या पोलीस ठाण्यांचा कारभार प्रभारींवर
दिगांबर जवादेगडचिरोली : जिल्ह्यातील एकूण १५ पोलीस ठाण्यांपैकी आठ पोलीस ठाण्यांचा कारभार मागील काही दिवसांपासून प्रभारी अधिकार्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे नक्षलविरोधी अभियान राबविताना अडचणी येत आहेत.गडचिरोली पोलीस दलात जवळपास सात हजार पोलीस असून हे सर्व १५ पोलीस ठाण्यांच्या अखत्यारित काम करीत आहेत. येथील पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना स्थानिक गुन्ह्यांचा तपास करण्याबरोबरच नक्षलविरोधी मोहिमेची आखणी करावी लागते. प्रत्यक्ष जंगलात जाऊन नक्षलविरोधी अभियानसुद्धा राबवावे लागते. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथील पोलीस विभागावर कामाचा मोठा ताण आहे.येथील कामाची जबाबदारी लक्षात घेता, पोलीस ठाण्यांच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षक दर्जाचा अनुभवी पोलीस अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पुराडा, कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली, जारावंडी, भामरागड व आसरअल्ली या पोलीस ठाण्यांचा कारभार मागील कित्येक दिवसांपासून प्रभारींवरच चालविला जात आहे. काही पोलीस ठाण्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक तर काही पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या नवख्या अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.-----आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी गडचिरोली पोलीस दलातील अधिकार्यांची पदे रिक्त राहणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली होती. जो अधिकारी रूजू होणार नाही, त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात होता. त्यामुळे मागील वर्षीपर्यंत प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस निरीक्षक दर्जाचाच अधिकारी कार्यरत होता.----शासनाने गडचिरोली जिल्ह्यात सहा पोलीस निरीक्षकांना नेमणूक दिली. मात्र दीड महिना उलटूनही ते रूजू झालेले नाहीत. त्यामुळे पोलीस स्टेशनचा प्रभार त्या पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्याकडे सोपविण्यात आला आहे.- संदीप पाटील, पोलीस अधीक्षक, गडचिरोली