नवी दिल्ली : सीआयएसएफने देशभरातील सर्व विमानतळांवरील सुरक्षा प्रणालीत बदल केला आहे आणि आता प्रवाशांची पारंपरिक तपासणी करण्याऐवजी ‘डावपेचात्मक तपासणी’ सुरू केली आहे. प्रवाशांना होणारा त्रास कमी करणे आणि नागरी हवाई परिचालनातील उच्चस्तरीय सुरक्षा सुनिश्चित करणे हा त्यामागचा हेतू आहे.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) हे निमलष्करी दल देशातील ५९ नागरी विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था सांभाळते आणि भविष्यात आणखी काही विमानतळांची सुरक्षा या दलाच्या सुपूर्द करण्यात येणार आहे. या निमलष्करी दलाने आपल्या विमानतळ सुरक्षा गटाला (एएसजी) आणि कर्मचाऱ्यांना याबाबत दिशानिर्देश जारी केले आहेत आणि आता नवी सुरक्षा प्रणाली लागू करण्यास सांगितले आहे. ज्यात प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करण्यास लागणारा वेळ वाचविण्याचा समावेश आहे, अशी माहिती सीआयएसएफचे प्रमुख अरविंद रंजन यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सीआयएसएफ विमानतळावरील सुरक्षा प्रणालीत बदल करणार
By admin | Updated: August 18, 2014 03:27 IST