व्यापमं घोटाळ्याची सीबीआय चौकशी होणार
By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST
मुख्यमंत्री शिवराजसिंग यांची घोषणा : अखेर मध्य प्रदेश सरकार झुकले
व्यापमं घोटाळ्याची सीबीआय चौकशी होणार
मुख्यमंत्री शिवराजसिंग यांची घोषणा : अखेर मध्य प्रदेश सरकार झुकलेभोपाळ: देशभरात गाजत असलेल्या आणि अनेक गूढ मृत्यूंनी व्यापलेल्या मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची शिफारस राज्य सरकारतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आली.खोलवर पाळेमुळे पसरलेल्या या घोटाळ्यात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचे नाव गोवण्यात आले असून विरोधकांकडून होत असलेल्या चौफेर टीकेपुढे अखेर त्यांना झुकावेच लागले. सीबीआय चौकशीसाठी उच्च न्यायालयाला विनंती करण्याची घोषणा चौहान यांनी सकाळीच केली होती. व्यापमं घोटाळ्याशी संबंधित बळींची संख्या ४९ वर पोहोचली असून गेल्या आठवडाभरात पाच जणांच्या गूढ मृत्युमुळे जनमानस ढवळून निघाले आहे. परंतु चौहान यांचा हा निर्णय काँग्रेसला कदापि मान्य नसून केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच सीबीआय तपासाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकते, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.चौहान यांनी येथे मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोघांप्रति माझ्या मनात आदर आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसटीएफ आणि एसआयटीमार्फत सुरू असलेल्या व्यापमं घोटाळ्याच्या चौकशीवरही माझा पूर्ण विश्वास आहे. परंतु मृत्यूंच्या नावावर जे वातावरण तयार करण्यात येत आहे त्यामुळे लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. लोकशाहीत जनभावना अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच जनभावनेचा आदर राखून मी उच्च न्यायालयाला व्यापमं घोटाळ्याची चौकशी सीबीआयमार्फत करण्याचा आदेश देण्याची विनंती करणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांच्यासह इतर काही लोकांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय ९ जुलै रोजी सुनावणी करणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी उचललेले पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.व्यापमंमधील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर आपणच निष्पक्ष चौकशीसाठी हे प्रकरण एसटीएफकडे सोपविण्याचा निर्णय घेतला होता, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीसाठी वेळोवेळी दाखल याचिकांचा निपटारा करताना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही एसटीएफ चौकशीवर समाधान व्यक्त केले होते, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. रात्रभर जागून घेतला निर्णय अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण उपस्थित झाले तरी आपली भूमिका हीच राहील. तेथेही आपण सीबीआय चौकशीचा आग्रह धरू. हा निर्णय मी स्वत: घेतला असून यासंदर्भात कुणाशीही विचारविनिमय केलेला नाही. मी काल रात्रभर झोपलो नाही. अत्यंत गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाचा विचार केला आणि व्यापमं घोटाळ्याची चौकशी सीबीआयच्या सुपूर्द करण्याबाबत उच्च न्यायालयाला विनंती पत्र लिहिण्याचे ठरविले, असे प्रतिपादनही त्यांनी केले. काँग्रेसला या प्रकरणाचा तपास अथवा मृत्यूशी काही देणेघेणे नाही. त्यांचा एकमेव उद्देश शिवराजसिंग चौहानची कोंडी करणे आणि त्यांची प्रतिमा मलीन करणे एवढाच आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयात ९ जुलैला सुनावणीदरम्यान व्यापमं घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंग आणि तीन व्हिसलबेलोअर्सच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय ९ जुलैला सुनावणी करणार आहे.सिंग यांच्याशिवाय आशिष चतुर्वेदी, डॉ. आनंद राय आणि प्रशांत पांडे यांनी या याचिका केल्या आहेत. आठवड्यात पाच मृत्यूया प्रकरणाचा तपास करीत असलेले जबलपूर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता अरुण शर्मा यांचा रविवारी दिल्लीत मृत्यू झाल्यानंतर चौहान यांच्यावर विरोधी पक्षांकडून आणि प्रामुख्याने काँग्रसने सीबीआय चौकशीसाठी दबाव वाढविला होता. याच्या एक दिवसपूर्वी व्यापमं गैरव्यवहाराच्या वृत्तांकनासाठी झाबुआला गेलेले दिल्लीतील एका वृत्तवाहिनीचे पत्रकार अक्षयसिंग यांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी त्यांनी या घोटाळ्यातील एक मृत आरोपी तरुणीच्या आईवडिलांची मुलाखत घेतली होती. गेल्या आठवडाभरात शर्मा आणि सिंग यांच्यासह घोटाळ्याशी संबंधित पाच जणांचा रहस्यमय मृत्यू झाला. (प्रतिनिधी)बॉक्समलाही व्यापमंची भीती वाटतेय-उमा भारतीमध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्याशी संबंधित मृत्यूच्या तांडवाने राज्यात दहशत निर्माण झाली असतानाच केंद्रीय मंत्री आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती या सुद्धा घाबरल्या आहेत. मी एक मंत्री आहे. परंतु तरीही मला या रहस्यमय घटनांची भीती वाटत असून आपली ही भावना मी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे व्यक्त करणार आहे, असे केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती यांनी सांगितले. उमा भारती यांना वाटणाऱ्या चिंतेबाबत पत्रकारांची छेडले असता मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, त्यांचा मी आदर करतो. त्या पक्षात नव्हत्या तेव्हाही मी त्यांच्याबद्दल कधी काही बोललो नाही. उमा भारती यांनी त्यांच्या अंत:करणातील भावना व्यक्त केल्या असतील. त्यांच्या वक्तव्यावर मी आताही काही बोलणार नाही.काँग्रेसकडून शिवराजसिंग चौहान यांच्या राजीनाम्याची मागणीनवी दिल्ली: प्रचंड दबावानंतर मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी घेतल्यानंतर काँग्रेसने आता मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. निष्पक्ष चौकशीसाठी शिवराजसिंग चौहान यांनी राजीनामा देणे आवश्यक असल्याचे पक्षाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी येथे सांगितले.मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही काँग्रेस आपल्या मागणीवर ठाम असून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी व्हावी अशी पक्षाची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्याही जीवाला धोका होऊ शकतो या केंद्रीय मंत्री उमा भारती आणि एसटीएफ अधिकाऱ्यांच्या चिंतेनंतर या प्रकरणाची गांभीर्य आणखी वाढले आहे. आतापर्यंत ४८ मृत्यू झाल्याने त्यांना भीती वाटणे स्वाभाविक आहे, असा युक्तिवाद शिंदे यांनी केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री चौहान यांनी सीबीआय चौकशीसाठी उच्च न्यायालयाला विनंती पत्र पाठविण्याचे म्हटले आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात ९ जुलैला याप्रकरणी दाखल याचिकावर सुनावणी होणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी स्वत: सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीचा प्रस्ताव मांडला पाहिजे. व्यापमं घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी असून एसआयटी आणि एसटीएफ तपासात अपयशी ठरले आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्ला केला. मोदी यांनी मौन सोडून याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे,अशी मागणी पक्षाने केली. (प्रतिनिधी)कोटसीबीआय तपासासाठी उच्च न्यायालयाला विनंती करण्याचा शिवराजसिंग चौहान यांचा निर्णय म्हणजे सत्य दाबण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. काँग्रेस हा निर्णय फेटाळून लावते. निष्पक्ष चौकशी आणि पीडितांना न्याय मिळण्यासाठी या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयमार्फत होणे आवश्यक आहे.रणदीप सुरजेवाला प्रसिद्धी प्रमुख,काँग्रेस