मुंबई : एकदा माझ्याकडे सत्ता द्या आणि मग पाहा मी काय करतो ते, असे आवाहन करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पूर्णत: नाकारले, हेच आजच्या निकालाच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे. दुसरीकडे मुंबईतील शिवसेनेचा आवाज एकेकाळच्या मित्रपक्ष भाजपानेच बंद केला आहे. ३६ पैकी तब्बल १५ जागांवर विजय नोंदवत भाजपाने आपले थोरलेपण सिद्ध केले. तर १४ जागा मिळूनही शिवसेनेला मुंबईतील वर्चस्वासाठी झगडावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा-शिवसेनेच्या संघर्षात काँग्रेसने पाच जागा राखण्यात यश मिळविले. राष्ट्रवादीनेही मुंबईतील आपले अस्तिव गमावले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आणत तसेच ५0 जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या मनसेला या निवडणुकीत भोपळाही फोडता न आल्याने मनसे जवळपास मोडीत निघाल्याचे पाहावयास मिळाले. टोलविरोधातील हिंसक आंदोलने करून जनतेचा पाठिंबा मिळवू पाहाणाऱ्या मनसेबाबत मतदार उदासीन राहिले. राज ठाकरे यांची आक्रमक, आक्रस्ताळी भाषणे तसेच मिमिक्री मतदारांना प्रभावित करू शकली नाही. मात्र त्याचवेळी संयमी नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभूती राहिल्याने मुंबईतील शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ झाली. मराठी अस्मितेला फुंकर घालत शिवसेनेने भाजपावर टीकेचे आसूड उगारले. या खेळीने शिवसेना ४ वरून १४ जागांवर पोहोचली. विशेष म्हणजे शिवसेनेचा डाव एकप्रकारे भाजपाच्याच पथ्यावर पडला. भाजपाचे सहानुभूतीदार असलेल्या मराठी मतदारांसह गुजराती आणि उत्तर भारतीय मते भाजपाच्या बाजूने फिरली. मतांच्या टक्केवारीतही भाजपा सरस ठरली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेसह अन्य सत्ताकारणात भाजपा दुय्यम नव्हे, तर महत्त्वाच्या भूमिकेत बसेल इतके मात्र नक्की. अस्मितेच्या या लढाईत कॉंग्रेसची मात्र चांगलीच घसरगुंडी झाली. अनेक दिग्गज नेते आणिं मंत्रीपद भूषविलेल्या नेत्यांना पराभवाला सामोर जावे लागले. १७ पैकी केवळ पाच जागा कॉंग्रेसला राखता आल्या. सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे, कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह, अशोक जाधव असे दिग्गज पराभूत झाले. मंत्री राहिलेल्या वर्षा गायकवाड कशाबशा विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचाही सुफडा मुंबइतून साफ झाला. मंत्री राहीलेले सचिन अहिर, प्रवक्ते नवाब मलिक पराभूत झाले. मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे यांच्यासह सर्व विद्यमान आमदार पराभूत झाले.अनेक ठिकाणी पहिल्या तिघांतही मनसे उमेदवार नसल्याचे आकडेवारी सांगतले. मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे एमआयएमने उघडलेले खाते. भायखळयात वरीस युसूफ पठाण यांनी मिळविलेला विजय मात्र धोक्याचा इशारा ठरणार आहे. एमआयएमच्या निमित्ताने मुंबईतही कट्टरतेचे राजकारण सुरु होणार का, हा प्रश्न येत्या काळात मोठा बनत जाणार आहे. या विधानसभेत मुंबईतील भाजपा १५, शिवसेना १४, काँग्रेस ५, सपा १ व एमआयएम १ असे बलाबल आहे. सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या ठाणे - पालघर जिल्ह्यातही भाजपाने मुसंडी मारली आहे. दोन्ही जिल्ह्यातील २४ पैकी ९ जागा जिंकून भाजपाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या खेपेपेक्षा ४ जागा त्यांनी अधिक मिळविल्या आहेत. या दिलासादायक विजयामुळे रामभाऊ म्हाळगी, राम कापसेंच्या काळात असलेले वैभव या निवडणुकीने भाजपाला पुन्हा ठाणे जिल्ह्यात प्राप्त करून दिले आहे. निकालानंतर दोन्ही जिल्ह्यातील दोन मंत्र्यांसह १३ विद्यमान आमदारांना घरी बसावे लागले आहे. शिवसनेनेला ठाणे शहरासह कल्याण-डोंबिवलीत मोठा धक्का बसला आहे. अंदाजाप्रमाणे दोन्ही जिल्हे काँग्रेसमुक्त झाले असून पक्षश्रेष्ठींच्या धरसोडीच्या राजकारणामुळे पालघरची एकमेव राजेंद्र गावितांची जागाही काँग्रेसने गमावली आहे. तर अपक्षेनुरूप राज ठाकरेंच्या मनसेने बहुतेक सर्व ठिकाणी आपली डिपॉझिट गमावली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाजपाच्या मंदा म्हात्रेंनी अनपेक्षित असा पराभव करून सर्वांनाच धक्का दिला आहे. तर कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांनी आपला गड अबाधित ठेवला आहे. ठाणे शहरातील मतदारांनी शिवसेनेने निष्ठावंताना डावलून काँग्रेसमधून आयात केलेल्या रवींद्र फाटक यांना नाकारले आहे. याठिकाणी २0 वर्षानंतर कमळाच्या चिन्हावर शिक्का मारायला संधी मिळालेल्या ठाणेकरांनी भाजपाच्या संजय केळकरांना विजयी केले. तर दुसरीकडे शिवसेनेने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या विजय चौगुलेंना ऐरोलीतून दिलेली उमेदवारी सुज्ञ नवी मुंबईकरांनी पुन्हा एकदा नाकारली) हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर या पितापुत्रांनी वसई -नालासोपारासह बोईसरमध्ये आपलाच बोलबाला असल्याचे पुन्हा एकदा सि केले आहे. ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी उच्च न्यायालयाने पप्पू कलानी यांनी यांची शिक्षा कायम ठेवल्याने सहानुभूती मिळालेल्या ज्योती कलानी यांनी भाजपाचे कुमार आयलानी यांचा पराभव केला. मुरबाडमध्ये किसन कथोरेंनी भाजपाच्या तिकीटावर विजय मिळविला असला तरी विजय भाजपाचा नसून कथोरेंचा वैयक्तिक विकास कामांचा आहे. शहापूर मधून राष्ट्रवादीच्या पांडूरंग बरोरा यांनी विजय प्राप्त करून शिवसेनेच्या दौलत दरोडांना विजयाची हॅट्रिकपासून लांब ठेवले. या दोन्ही जिल्ह्यात नव्या विधानसभेत शिवसेना- ७, भाजपा- ९, राष्ट्रवादी-४, बविआ-३ अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. पनवेलमधून काँग्रेस आमदार यावेळी भाजपाच्या तिकीटावर निवडून आल्याने या जिल्ह्यात भाजपाने खाते खोलले आहे. अलिबाग आणि पेणमधील जागा शेकापने कायम ठेवल्या असल्या तरी उरणमध्ये शिवसेनेचे मनोहर भोईर निवडून आल्याने ती जागा गमावली आहे. तर महाडमध्ये भरत गोगावले यांनी सेनेचा गड कायम ठेवला आहे. भाजप १, शेकाप २, राष्ट्रवादी २ आणि शिवसेना २ असे रायगडचे बलाबल आहे.