ऑनलाइन लोकमत
आग्रा येथील मुस्लीमांच्या घरवापसी कार्यक्रमाचे किंवा मुस्लीमांचे झर्मांतर करून त्यांना हिंदुधर्मात आणण्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आज लोकसभेमध्ये उमटले. धर्मांतराच्या मुद्यावर संसदेमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यासह अन्य विरोधकांनी केली. सुमारे २०० मुस्लीमांना होमहवन करून एका कार्यक्रमात हिंदुधर्मात आणण्याची घटना दोन दिवसांपूर्वी आग्रा येथे घडली. हे धर्मांतर स्वेच्छेने झाल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परीवारातील संघटनेने केला. तर हे धर्मांतर पैशाचे व घराचे लालूच दाखवून झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सदर मुस्लीम व्यक्ती मूळचे उत्तर प्रदेशातील नसून पश्चिम बंगालमधील आहेत तर काहींच्या मते ते बांग्लादेशातून आलेले बेकायदेशीर रहिवासी आहेत. दरम्यान. अत्यंत गरीब परिस्थितीतील या मुस्लीमांनी नक्की कशामुळे धर्मांतर केले, पैशाच्या लालसेने, जबरदस्तीमुळे की स्वेच्छेमुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही वृत्तांनुसार या मुस्लीमांना हिंदुंमधील काही व गट व मुस्लीमांमधील काही गट दोन्हीकडून दबावाला बळी पडावे लागत आहे.
दरम्यान, भाजपाचे नेते व्यंकय्या नायडू यांनी या सगळ्या प्रकरणार भाजपाचा काहीही संबंध नसल्याचे सांगत जबरदस्तीने केलेल्या धर्मांतराला आपला विरोध असल्याचे सांगितले. तसेच सगळ्या पक्षांचे मत असेल तर धर्मांतरासच बंदी घालणारा कायदा करण्याचीही आपली तयारी असल्याचे नायडू म्हणाले.