ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २१ - नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच ट्विटरवरुन भाजप व काँग्रेसमध्ये एक नवीन वाद निर्माण झाला आहे. मावळते पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात सुरु करण्यात आलेले पंतप्रधान कार्यालयाचे ट्विटर अकाऊंट डिलीट करण्यात आले आहे. भाजपने यावर आक्षेप घेतला असून पंतप्रधान कार्यालयाचे ट्विटर अकाऊंट हे एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक अकाऊंट नसून ते पंतप्रधान कार्यालयाचे ट्विटर अकाऊंट होते. त्यामुळे हे अकाऊंट डिलीट करुन काँग्रेसने पंतप्रधानपदाचा अपमान केल्याचा आरोप भाजपन केला आहे.
सोशल नेटवर्किंग साईटचे प्रभावी वापर करुन जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मावळेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ट्विटरवर @PMOIndia या नावाने एक ट्विटर अकाऊंट तयार करण्यात आले होते. पंतप्रधान कार्यालय महत्त्वाच्या निर्णयाची माहिती या अकाऊंटवरुन द्यायचे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव करुन भाजपचे नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच @PMOIndia हे अकाऊंट डिलीट करण्यात आले. हे हँडल कोसर अली नामक एका तरुणाने चालवायला घेतले.अखेर हा प्रकार ट्विटर इंडियाच्या लक्षात आला व त्यांनी हस्तक्षेप करत हे अकाऊंट पुन्हा सुरु केले. आता हे अकाऊंट ट्विटरवर @पीएमओइंडिया अकाईव्ह या नावाने दिसत आहे.
दरम्यान, भाजपने यावर आक्षेप घेतला आहे. @पीएमओइंडिया हे अकाऊंट मनमोहन सिंग वैयक्तिक अकाऊंट नव्हते. ते पंतप्रधान कार्यालयाचे अकाऊंट आहे. पंतप्रधान कार्यालयाने भूतकाळात दिलेली माहिती म्हणजे राष्ट्राची डिजीटल संपत्ती असल्याने अकाऊंट डिलीट करणे हा काँग्रेसचा बेजबाबदारपणा असल्याची टीकाही भाजपने केली आहे. दरम्यान, आता नवनियुक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नवीन ट्विटर अकाऊंट सुरु करण्यात येणार आहे.