बदायूँ : झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आलेल्या दोन दलित बहिणींवर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आता या नराधमांना न्यायालयात दोषी ठरविण्यासाठी ठोस पुरावे गोळा करण्यात येत आहेत, असे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे. या बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी जाबजबाबादरम्यान आपला गुन्हा कबूल केला आहे, असे पोलीस अधीक्षक अतुल सक्सेना यांनी सांगितले. तथापि, त्यांनी या दोन्ही आरोपींची ओळख सांगण्यास नकार दिला. अशा प्रकरणात आरोपी सहसा न्यायालयात आपले जबाब बदलतात. त्यांना असे करण्याची संधी मिळू नये म्हणून आम्ही आता ठोस पुरावे गोळा करीत आहोत. आरोपींच्या कबुलीजबाबापेक्षा ठोस पुराव्यांवर आम्ही निर्भर राहू, असे ते म्हणाले. या बलात्काराच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पप्पू यादव, अवधेश यादव आणि उर्वेश यादव या तीन भावांसह कॉन्स्टेबल छत्रपाल यादव आणि सर्वेश यादव या दोन पोलिसांना याआधीच अटक करण्यात आली आहे. बदायूँ येथील १४ आणि १५ वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन दलित मुलींवर सामूहिक बलात्कार आणि हत्या करण्यात आली होती. या दोघींचे मृतदेह एका आंब्याच्या झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळले होते. या दोघीही २७ मेपासून बेपत्ता होत्या. २८ मे रोजी त्यांचे मृतदेह आढळले. (वृत्तसंस्था)
बदायूँ : २ आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली
By admin | Updated: June 2, 2014 06:03 IST