Ayodhya Ram Mandir: महाकुंभ मेळ्यानंतर आता भाविकांची पावले अयोध्येतल्या राम मंदिराकडे वळाली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अयोध्येतील राम मंदिरांत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे प्रशासनालाही कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागतेय. प्रशासनाकडून गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी चोख बंदोबस्त आणि नियोजन करण्यात आलं आहे. मात्र याचा काही प्रमाणात भाविकांनाही त्रास होताना दिसत आहे. राम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्यांच्या चप्पल किंवा बुटांसाठी पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून अयोध्येत मोठ्या प्रमाणात गर्दी होतेय. त्यामुळे तिथल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतोय. गर्दीमुळे तिथल्या दर्शनाच्या व्यवस्थापनाचे काही नियम बदलण्यात आले आहेत. त्यामुळे भाविक मंदिराच्या मुख्य प्रवेशदाराच्या आसपास त्याच्या चपला आणि बूट काढून जात आहे. मात्र ते परत घेण्यासाठी अनेक जण येत नसल्याने त्यांना हटवणे हे प्रशासनासाठी मोठं आव्हान बनलं आहे. त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वारावर दररोज लाखो बूट आणि चप्पल जेसीबी मशिनद्वारे ट्रॉलीमध्ये भरून ४-५ किलोमीटर अंतरावर टाकले जात आहेत.
गेल्या महिनाभरापासून अयोध्या महानगरपालिकेचा राम मंदिराजवळ काढलेल्या चपला आणि बुटांची विल्हेवाट लावण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून जेसीबीच्या साहाय्याने दररोज सुमारे लाखो बूट आणि चप्पल गोळा केल्या जातात. त्यानंतर ते ट्रॉलीमध्ये भरून ५ किलोमीटर अंतरावर फेकल्या जात आहेत.
गर्दी व्यवस्थापनाच्या नियमात बदल केल्यापासून महापालिका आणि भाविकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. राममंदिराचे गेट क्रमांक एक हे राम मार्गावर असलेले प्रवेशद्वार आहे. भाविकांना चपल्ल येथे जमा करण्यास सांगितले जात आहे. दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात सुमारे अर्धा किलोमीटरची पायपीट केल्यानंतर लोकांना चप्पल घेण्यासाठी त्याच गेटवर परतावे लागतं. मात्र गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अयोध्या प्रशासनाने लोकांना गेट क्रमांक तीन आणि इतर गेटमधून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे भाविकांना त्यांची चप्पल आणि बूट परत मिळवण्यासाठी गेट क्रमांक एकवर यावे लागत आहे. त्यासाठी लोकांना ४-५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. अनेक लोक बूट आणि चप्पल तिथेच सोडून अनवाणी मंदिरातून बाहेर पडत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
"दर्शनानंतर भाविक श्री राम हॉस्पिटलच्या पुढे जातात. रामपथ हा एकेरी मार्ग असल्याने भाविकांना चप्पल ठेवण्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पुन्हा ५ ते ६ किलोमीटर चालत जावे लागते. त्यामुळेच गेट क्रमांक एकवर चपला-चप्पलांचा ढीग साचला आहे," अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी म्हटलं.