ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि हिंदू महासभेचे नेते व बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय (मरणोत्तर) यांना यंदाचा 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. 'वाजपेयी व मालवीय या दोघांना भारतरत्न देण्यात आल्याचे जाहीर करताना आपल्याला आनंद होत आहे' असे ट्विट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अधिकृत अकाऊंटवरून करण्यात आले. थोड्याच वेळापूर्वी घेण्यात आलेल्या कॅबिनेट बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. वाजपेयी व मालवीय या दोघांचाही २५ डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सरकारतर्फे 'गुड गव्हर्नन्स डे' साजरा करण्यात येणार असून 'भारतरत्न' पुरस्काराच्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाची ही आणखी एक अमूल्य भेट देण्यात आली आहे. तर पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. २६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी वाजपेयी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाजपेयींना भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तर वाजपेयींना हा पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी ऐकताच आपल्याला अतिशय आनंद झाल्याची प्रतिक्रिया गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. तसेच वाजपेयींच्या अनेक आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.
ब-याच वर्षांपासून भाजपातर्फे वाजपेयींना देशातील हा 'सर्वोच्च नागरी पुरस्कार' देण्याची मागणी सुरू होती. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेवर आले आणि वाजपेयींना यंदाचा 'भारतरत्न' मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आज देशाच्या माजी पंतप्रधानांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
२५ डिसेंबर १९२४ साली ग्वाल्हेर येथे जन्मलेले वाजपेयी हे भारतीय जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात त्यांनी दोन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषवले तसेच केंद्रात विविध पदेही हाताळली. अणू चाचणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेत त्याची अमलबजावणी करण्याचे कामही त्यांनी केले. तसेच दिल्ली-लाहोर दरम्यान बससेवा सुरू करून भारत- पाकिस्तानचे संबंध सुधारण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. उत्कृष्ट वक्ता आणि कवि मनाचा नेता अशी ओळख असलेल्या वाजपेयी यांनी त्यांच्यावक्तृत्त्व कौशल्याने अनेकांची मने जिंकली.
तर २५ डिसेंबर १८६१ साली अलाहाबाद येथे जन्म झालेल्या पंडित मदन मोहन मालवीय यांनी संस्कृत व हिंदीत विपुल लेखन केले. बनारस हिंदू विद्यापीठाची त्यांनी स्थापना केलीय तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते चार वेळा अध्यक्ष राहिले आहेत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते असलेल्या मालवीय यांनी १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच १२ नोव्हेंबर १९४६ रोजी त्यांचे निधन झाले.
आत्तापर्यंत देशातील ४३ व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात आले असून त्या यादीत आता वाजपेयी व मालवीय यांचे नावही समाविष्ट झाले आहे. गेल्या वर्षी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व शास्त्रज्ञ सी.एन.आर. राव यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.