निंबा परिसरात कृत्रिम पाणीटंचाई कर्मचार्यांची कर्तव्याला बगल: ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
जानोरी मेळ: बाळापूर तालुक्यातील मोखा, जानोरी मेळ, निंबा या गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत पाणीपुरवठा केला जातो; परंतु गत काही दिवसांपासून या भागातील लोकांना मुबलक पाणी असतानाही केवळ कर्मचार्यांच्या कामचुकार वृत्तीमुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
निंबा परिसरात कृत्रिम पाणीटंचाई कर्मचार्यांची कर्तव्याला बगल: ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती
जानोरी मेळ: बाळापूर तालुक्यातील मोखा, जानोरी मेळ, निंबा या गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत पाणीपुरवठा केला जातो; परंतु गत काही दिवसांपासून या भागातील लोकांना मुबलक पाणी असतानाही केवळ कर्मचार्यांच्या कामचुकार वृत्तीमुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी मजीप्राने निंबा फाटा येथे चार कूपनलिका खोदल्या आहेत. या कूपनलिकांना पाणीही मुबलक प्रमाणात आहे; परंतु पाणी सोडण्याची जबाबदारी असलेले कर्मचारी कर्तव्याला बगल देऊन वैयक्तिक कामांनाच प्राधान्य देत असल्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याचा स्थानिक लोकांचा आरोप आहे. या भागात कार्यरत असलेले मजीप्राचे कर्मचारी काही भागात हेतुपुरस्सरपणे पाणी सोडत नसल्याचाही आरोप लोकांकडून केला जात आहे. या कर्मचार्यांवर वरिष्ठांचा वचक नसल्यामुळे ते मनमानी करीत असून, पाणी सोडण्याची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत नसल्याचे दिसून येत आहे. भरपूर पाणी असतानाही केवळ कर्मचार्यांच्या वेळकाढू धोरणामुळे परिसरातील ग्रामस्थांपर्यंत पाणीच पोहोचत नाही. पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागते. या भागात पाण्याचा दुसरा स्रोत नसल्यामुळे लोकांना नाईलाजाने दूरवरून पाणी आणावे लागते. कर्मचार्यांनी वेळेवर व नियमितपणे पाणी सोडल्यास पाणीटंचाई जाणवणार नाही; परंतु, येथील कर्मचारी वैयक्तिक कामांना प्राधान्य देऊन कर्तव्याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप लोकांकडून होत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)------कोटया भागात विद्युत पुरवठा कमी दाबाचा असून, विद्युत भारनियमनही सुरू आहे. त्यामुळे मोटारपंप पाण्याचा उपसा करण्यात अपयशी ठरत आहेत. कर्मचारी कर्तव्यात कसूर करीत असल्याबाबतच्या आरोपांची चौकशी करून दोषी आढळलेल्यांविरुद्ध कार्यवाही केली जाईल. - आर. एन. इंगळे, वरिष्ठ अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बाळापूर