लखनौ : केवळ अधिकार्यांची बदली आणि निलंबन करून भागणार नाही. समाजवादी पार्टीच्या सरकारने आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना वेसण घातली पाहिजे, अशा शब्दात बसपा नेत्या मायावती यांनी बदायूँ बलात्कार प्रकरणावरून रविवारी अखिलेश यादव सरकारवर टीका केली. राज्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती पूर्णत: कोलमडली असल्याने त्वरित राष्टÑपती राजवट लागू करण्यात यावी, या आपल्या मागणीचा मायावती यांनी पुनरुच्चार केला. परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे जमत नसेल तर जनतेच्या हितासाठी या राज्य सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे; अन्यथा राज्यात राष्टÑपती राजवट लागू करावी, अशी मागणी आम्ही राज्यपालांना करू. या दिशेने केंद्र सरकारनेही पुढाकार घेतला पाहिजे. नाही तर राज्याची जनता सपासोबतच भाजपालाही माफ करणार नाही, असे मायावती म्हणाल्या. मायावती यांनी बदायूँ येथे सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या दोन दलित बहिणींच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले. यावेळी मायावती यांनी या दोन्ही दलित मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदतही जाहीर केली. या बलात्काराच्या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या संदर्भात सपाप्रमुख मुलायमसिंग यादव यांनी केलेल्या वादग्रस्त वस्तव्याचा समाचार घेताना मायावती म्हणाल्या, अशा बलात्काराच्या घटनांमध्ये यादव यांच्याच पक्षाचे लोक सामील आहेत; शिवाय पोलिसांचीही त्यांना साथ आहे. या बलात्कार्यांना वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बदायूँ बलात्कार प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करून फासावरच लटकविण्यात आले पाहिजे. (वृत्तसंस्था)
उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा
By admin | Updated: June 2, 2014 06:19 IST