ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २३ - 'लव्ह जिहाद'च्या माध्यमातून हिंदूचे जबरदस्तीने करण्यात येणा-या धर्मांतराचा मुद्दा उत्तर प्रदेश भाजपच्या अजेंड्यावर असून शनिवारपासून सुरू होणा-या भाजपच्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या 'धर्म जागरण मंच' या संघटनेने सुरू केलेल्या मोहिमेनंतर आता भाजपने हे पाऊल उचलले आहे. शनिवापासून मथुरा येथे होणा-या या बैठकीचे भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या बैठकीस उत्तर प्रदेशातील पक्षाचे राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीतीही आखण्यात येणार आहे. 'लव्ह जिहाद'च्या माध्यमातून विवाहासाठी हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान बनवण्यात येत असल्याचा आरोप या संघटनेतर्फे करण्यात आला होता.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण या मुद्यावरील चर्चेदरम्यान 'लव्ह जिहाद' आणि 'हिंदूंच्या धर्मांतराच्या' मुद्यावरही चर्चा होणार असून भविष्यात या समस्यांशी लढण्याची योजनाही या बैठकीदरम्यान ठरवण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी सांगितल. तसेच सहारणपूर, मोरादाबाद, मीरत आणि आंबेडकर नगर येथे झालेल्या जातीय हिसांचाराबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे, असे ते म्हणाले.
'लव्ह जिहाद' विरोधात लढणे हा आत्तापर्यंत फक्त संघाचा अजेंडा होता, मात्र केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपनेही या मुद्यात लक्ष घालत त्या विरोधात आवाज उठवणे सुरू केले आहे.
फैजाबाद येथे एका मुसलमान तरूणाने एका हिंदू तरूणीची हत्या करण्यात आली होती, याबाबतची माहिती वाजपेयींनी उत्तर प्रदेशच्या दौ-यावर आलेल्या अमित शहा यांना दिली होती. हे प्रकरण 'लव्ह जिहाद' अंतर्गतच येत असल्याची शंका स्थानिक नेत्यांना होती.