अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन करणार! जिल्हा परिषद शिक्षण समितीचा ठराव
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
अकोला: जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन रिक्त पदे असलेल्या शाळांवर करण्याचा ठराव, शुक्रवारी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.
अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन करणार! जिल्हा परिषद शिक्षण समितीचा ठराव
अकोला: जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन रिक्त पदे असलेल्या शाळांवर करण्याचा ठराव, शुक्रवारी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे सप्टेंबरअखेर जिल्हा परिषद शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया येत्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील सातही पंचायत समिती स्तरावर सुरू होणार आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना, ज्या ठिकाणी शाळांवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत, अशा ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे. तसेच संबंधित जिल्हा परिषद सदस्यांना विचारात घेऊनच शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करावी, असा ठराव या सभेत घेण्यात आला. सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात वादळीवारा आणि पावसामुळे नुकसान झालेल्या शाळा इमारतींची दुरुस्ती तसेच शिकस्त झालेल्या शाळा इमारती पाडून, नवीन वर्गखोल्या आणि शाळा इमारतींच्या आवारभिंत बांधकामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) तातडीने निधी उपलब्ध करण्याच्या मुद्यावर या सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समिती सदस्य ज्योत्स्ना चोरे, गोपाल कोल्हे, अनिता आखरे, संतोष वाकोडे, अक्षय लहाने यांच्यासह प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे व शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.बॉक्स.................................................................शालेय क्रीडा स्पर्धेसाठी आणखी ५ लाखांची तरतूद!जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा परिषद सेस फंडातून ५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्यासाठी हा निधी कमी असल्याने, विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेसाठी सेस फंडातून आणखी ५ लाखांची तरतूद करण्याचा ठराव शिक्षण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. समितीचा हा ठराव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याचेही या सभेत ठरविण्यात आले.