ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावर याच्यावर लैंगिक छळाचा आरोप लावण्यात आला असून कॅनडातील न्यायालयात त्याच्याविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत. कॅनडातील उत्तर व्हँन्कोयुवर भागात राहणारे भारतीय वंशाच्या पर्सी श्रॉफ व जिमी मिस्त्री या दोघांनी शामकविरोधात कोलंबियाच्या सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली असून ते चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून अश्लील हातवारे करत असा गंभीर आरोप केला आहे. मात्र शामकने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून हे दोन्ही नर्तक आपले चारित्र्य आणि आपला संबंध असलेल्या संस्थेचे नाव खराब करायचा प्रयत्न करत असल्याचे त्याने म्हटले आहे.
शामक हा बराच काळ उत्तर व्हँन्कोयुवरमध्ये वास्तव्यास असतो आणि तेथील 'व्हीआरआरपी' या धार्मिक प्रशिक्षण गटाची सूत्रे सध्या त्याच्याकडे आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शामक गेली अनेक वर्ष आपला लैंगिक छळ करत असल्याचा आरोप पर्सी श्रॉफ व जिमी मिस्त्री यांनी केला आहे. शामक हा आमच्या धार्मिक प्रशिक्षण संस्थेतील गुरू असल्यामुळे एकप्रकारे आमच्या जीवनावर त्याचा हक्क आहे. मात्र त्याने त्याचा गैरफायदा उचलल्याने आम्हाला अनेक वर्षे त्याच्या अकारण लैंगिक स्पर्शाचा सामना करावा लागला आहे. शामकला देवाप्रमाणे मानून आम्ही त्याचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानत होतो, मात्र मी १६ वर्षांचा असल्यापासून त्याने मला लैंगिक छळासाठी तयार केले असा आरोप एका तरूणाने केला आहे.