नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, शत्रुघ्न सिन्हा, सनी देओल, मीरा कुमार, ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी, अशा दिग्गज उमेदवारांचे भवितव्य लोकसभा निवडणुकांच्या सातव्या टप्प्यासाठी रविवारी झालेल्या मतदानानंतर ईव्हीएममध्ये बंद झाले. सातही टप्पे यशस्वीरीत्या पार पडून सतराव्या लोकसभा निवडणुकीचे सूप वाजले. सात राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ५९ जागांकरिता सातव्या टप्प्यात देशभरात सुमारे ६४.४५ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगाल व पंजाबमध्ये तुरळक हिंसाचाराचे घडलेले प्रकार वगळता अन्य राज्यांमध्ये शांततेने मतदान पार पडले. आता लोकसभानिवडणुकांच्या २३ मे रोजी लागणाऱ्या निकालांची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये (१३ जागा) ५५.५२ टक्के व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या बहुचर्चित मतदारसंघात ५७.८१ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये (९ जागा) ७३.४० टक्के, पंजाबमध्ये (१३ जागा) ५९ टक्के, हिमाचल प्रदेशमध्ये (४ जागा) ६६.७० टक्के, मध्यप्रदेशमध्ये (८ जागा) ६९.३६ टक्के, बिहारमध्ये (८ जागा), ५३.३६ टक्के, झारखंडमध्ये (३ जागा) ७०.९७ टक्के, चंदीगडमध्ये (एक जागा) ६३.५७ टक्के मतदान झाले. त्यासाठी निवडणूक रिंगणात ९१८ उमेदवार होते.
मध्यप्रदेशात काही ठिकाणी मतदानावर बहिष्कारमध्यप्रदेशमध्ये देवास लोकसभा मतदारसंघात अगर माळवा येथील एका व मंदसौर येथील पाच मतदान केंद्रांवर स्थानिक रहिवाशांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्याच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार टाकला. अरा, सासाराम, जेहनाबाद, पाटलीपुत्र, बक्सर येथील मतदारसंघांत ईव्हीएममधील बिघाड व अन्य कारणांमुळे मतदान प्रक्रियेत थोडेफार अडथळे आले.पंजाबमध्ये हाणामारीपंजाबमध्ये लुधियाना, मोगासहित काही मतदारसंघांत ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे प्रकार घडले. भटिंडातील तलवंडी साबो, गुरुदासपूर येथे काँग्रेस व भाजप-अकाली दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याचा आरोप अकाली दलाने केला आहे. उत्तर प्रदेशातील चंडौली लोकसभा मतदारसंघात भाजप व समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांत झटापट झाली. येथून उत्तर प्रदेश भाजपचे महेंद्रनाथ पांडे रिंगणात उतरले आहेत.
मात्र,मतदारांवर हल्ले होण्याची भीती : भाजपनिवडणूक आचारसंहिता लागू असेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय दले तैनात ठेवावीत, अशी मागणी भाजप नेत्या व केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर विशिष्ट मतदारांवर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते हल्ला करण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.