ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. १६ - सपा व बसपाचा गड अशी ओळख असलेल्या उत्तरप्रदेशात ४२ लाख लोकांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले असल्याची माहिती उत्तरप्रदेशचे भाजपा प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी १ नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या सदस्य अभियानाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत असून देशभरात तब्बल १.५४ कोटी लोकांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. उत्तरप्रदेशातील जवळपास ४२ लाख लोकांचा यामध्ये समावेश असल्याचे वाजपेयी म्हणाले. राज्यात समाजवादी पार्टीचे सरकार असून कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. याविरोधात तसेच वाढलेल्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपाने आंदोलन करण्याचे ठरविले असल्याचे वाजपेयी म्हणाले. अखिलेश सिंह यादव यांच्या मंत्रिमंडळातील गायत्री प्रसाद प्रजापती या मंत्र्याविरोधात तसेच नोएडातील मुख्य अभियंता यादव सिंग यांचा भ्रष्ट्राचार लोकांसमोर आणला जाईल, असे वाजपेयी यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला ८० जागांपैकी ७१ जागांवर विजय मिळाला होता. भाजपाला आगामी विधानसभा निवडणुकीतही घवघवीत यश मिळवून उत्तरप्रदेशात एकहाती सत्ता मिळवायची आहे.