ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २ - नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी विराजमान होताच प्रकल्पांना मंजूरी देण्याचा धडाका लावला असून मोदी सरकारने राष्ट्रीय नद्या जोडणी प्रकल्प मार्गी लावण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी मोदी सरकारने तब्बल २५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून या प्रकल्पांना नितीन गडकरींनी तत्वतः मंजूरी दिल्याचे वृत्त आहे.
२००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नद्या जोड प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणात एक समितीही नेमण्यात आली होती. मात्र त्यानंतर हा महत्त्वपूर्ण प्रकल्प बारगळला. आता पंतप्रधानपदावर विराजमान होताच नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाने हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रस्ते आणि शिपींग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाला तत्वतः मंजूरी दिली असून ८ वर्षांत हा प्रकल्प मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी २५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून गंगा, ब्रह्मपूत्रा, महानंदा, गोदावरी या नद्यांना जोडण्यात येणार आहे. यामुळे देशांतर्गत जलवाहतूक सुरु करणे सहज शक्य होणार आहे.