२४ तासात ४ लाचखोर जेरबंद
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
एसीबीचा धक्का : वीज कंपनीच्या अभियंत्यालाही झटका
२४ तासात ४ लाचखोर जेरबंद
एसीबीचा धक्का : वीज कंपनीच्या अभियंत्यालाही झटकानागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २४ तासात ४ लाचखोरांच्या मुसक्या बांधून भ्रष्टाचाऱ्यांना जोरदार धक्का दिला. एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्यांमध्ये वीज वितरण कंपनीचा वाडी येथील सहायक अभियंता, भूमापक आणि त्याचा दलाल तसेच काटोलच्या आगार व्यवस्थापकाचा समावेश आहे. प्रवीण शालिकराम गणेरआरोपी प्रवीण शालिकराम गणेर (वय ३६) हा विद्युत वितरण कंपनीत वाडी येथे सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहे. वडधामना येथील तक्रारकर्त्यांना त्यांच्या गोदामात वीजपुरवठा आणि नवीन वीज मीटर घ्यायचे होते. त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. तरीसुद्धा आरोपी अभियंता प्रवीण शालिकराम गणेर याने २५ हजारांची लाच मागितली. तडजोडीनंतर त्याने २३ हजाराची रक्कम मागितली. तक्रारकर्त्यांनी एसीबीकडे धाव घेतली. त्यावरून आज दुपारी सापळा रचून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गणेरच्या मुसक्या बांधल्या. दिग्विजय विष्णुपंत दंडे अशाच प्रकारे नगर भूमापन कार्यालयात तक्रारकर्त्यांच्या घराचे नामांतर करून देण्यासाठी २ हजारांची लाच मागणारा भूमापक दिग्विजय विष्णुपंत दंडे (वय ४०) याला आणि त्याच्यावतीने लाचेची रक्कम स्वीकारणारा भूमापन कार्यालयातील दलाल प्रशांत माधवराव राऊत (वय ४२) या दोघांना आज एसीबीच्या पथकाने जेरबंद केले.ऋषिकांत काशिनाथ मेश्राम शुक्रवारी एसीबीच्या पथकाने एसटीच्या काटोल डेपोचा आगार व्यवस्थापक ऋषिकांत काशिनाथ मेश्राम (वय ५१) याच्या मुसक्या बांधल्या. काही दिवसांपूर्वी मेश्रामने आपल्या सहकाऱ्यांसह एका बसची तपासणी केली. यात एक प्रवासी विनातिकीट आढळला तर, बसवाहकाजवळ तिकिटांच्या रकमेव्यतिरिक्त ३६ रुपये अतिरिक्त आढळले. त्यामुळे मेश्रामने केसपेपर तयार केले. या प्रकरणात कारवाई टाळायची असेल, तर ५ हजारांची लाच द्यावी लागेल, असे मेश्राम म्हणाला. तक्रारकर्त्या वाहकाने सरळ एसीबीकडे धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून सापळा रचून एसीबीच्या पथकाने शुक्रवारी जरीपटका परिसरात लाच स्वीकारताना मेश्रामला अटक केली. एसीबीचे अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक उप-अधीक्षक मिलिंद तोतरे, पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर, तसेच रमेश भोयर, कोमल बिसेन, प्रभाकर बल्ले, मनोहर डोईफोडे, हवालदार दिलीप जाधव, विलास खनके, मारोती कोळपेवाड, महिला शिपाई कोमल गुजर यांनी ही कामगिरी बजावली. ----