लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : गंगापूर व दारणा धरणातून सुरू असलेला गोदावरी नदीतील पाण्याचा विसर्ग आणि गोदाकाठ परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे सायखेडा येथे पुलाला पाणी लागले होते; मात्र पाणी पुलाखालून वाहून जाण्यास पुलाला अडकलेल्या पाणवेलींमुळे अडचण येत होती. पाणी वाहून न जाता पाण्याचा जोर वाढत होता आणि कमकुवत पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. पुलाला अडकलेल्या पाणवेली तातडीने काढाव्यात, अशी मागणी माजी आमदार दिलीप बनकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती, तसे निर्देश दिले होते. संबंधित यंत्रणेने तातडीने पाणवेली काढण्यास सुरुवात केली आहे.धरण क्षेत्रातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील मोठमोठ्या पाणवेली सायखेडा येथील गोदावरी नदीवरील पुलास अडकण्यास सुरु वात झाली होती. माजी आमदार दिलीप बनकर यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेत पुलाला अडकलेल्या पाणवेली काढण्याच्या सूचना केल्या होत्या. पुलाला अडकलेल्या पाणवेलींमुळे नदीपात्रात वरून येणारे पाणी अडवले जाऊन शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी जाण्याचा धोका वाढला आहे. सर्वात मोठा धोका पुलास निर्माण झाल्याने तसेच अगोदरच हा पूल कमकुवत असताना पावसाळा सुरू होऊन एक ते दीड महिना झाला असताना प्रशासनाने पाणवेली काढलेल्या नव्हत्या. यासंदर्भात जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर, गंगापूर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे आदींना फोनवरून तत्काळ पूर परिस्थितीवर उपाययोजना व सायखेडा, करंजगाव पुलाला अडकलेल्या पाणवेली काढण्याच्या सूचना आमदार दिलीप बनकर यांनी फोनद्वारे केल्या होत्या. याबाबत प्रसार माध्यमांत बातम्या आल्यावर संबंधित विभागाने या ठिकाणी अडकलेल्या पाणवेली काढण्यास सुरुवात केली आहे.पूरप्रश्नी तहसील कार्यालयात बैठकगोदावरी नदीच्या पुरामुळे सर्वाधिक तडाखा बसत असलेल्या सायखेडा, चांदोरी यासह गोदाकाठ गावांच्या तातडीच्या करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांनी सायखेडा तलाठी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पावसाळा सुरू असून, पूररेषेच्या आत व पूररेषेवर असणाऱ्या रहिवाशांनी घरात पाणी येण्याची आणि पूर येण्याची वाट पाहू नये त्यांनी आताच आपला रहिवास सोडावा व भविष्यात होणाऱ्या आपत्तीवर मात करावी.यावेळी पूररेषेवर असणाऱ्या व संभाव्य गंगानगर, मेनरोड परिसर, सायखेडा चौफुली, ग्रामपंचायत परिसर चांदोरीतील पूररेषेवरील नागरिकांना रहिवास सोडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. तसेच इतर माहिती घेण्यात आली. या बैठकीत पूरनियंत्रण कक्ष तैनात ठेवून त्यात पट्टीचे पोहणारे तज्ज्ञ उपलब्ध करून द्यावेत, पशुवैद्यकीय अधिकारी असावा, पाणबोटी लाइव्ह जॅकेट उपलब्ध करून द्यावे, बाधित क्षेत्रातील नागरिकांची व्यवस्था कॉलेज व शाळेमध्ये करण्यात यावी. पूर आल्यास किंवा आपत्ती काळात सायरन तसेच भोंगे लावून जागृती करावी आदींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पाणवेली काढण्याचे काम सुरु
By admin | Updated: July 16, 2017 00:45 IST