अजूनही मिळेना लसीकरण प्रमाणपत्र
नाशिक : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर पोर्टलवर किंवा नोंदणी केलेल्या लिंकवर तातडीने लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळत असले तरी नागरिक त्याबाबत अनभिज्ञ आहेत. मात्र, नागरिकांनी मागितल्यास त्यांना प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांना प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार आहे.
नियम तोडल्यास लागणार दंड
नाशिक : पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्याने जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होऊन सायंकाळी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे. मात्र, त्यानंतर नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई देखील केली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे शिथिलता मिळाली असली तरी नियमांचे पालन करावे लागणार आहे.
आगारात उभ्या असलेल्या बसेसची दुरवस्था
नाशिक : कोरोना निर्बंधामुळे अनेक बसेस आगारात उभ्या करण्याची वेळ आल्याने बसेसच्या मेंटनन्सचा प्रश्न महामंडळापुढे निर्माण झाला आहे. डेपो स्तरावर अनेक ठिकाणी बसेस एकाच जागी उभ्या असल्याने बसेसची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. ज्या बसेस चालविण्याची आवश्यकता आहे, अशाच बसेसवर लक्ष दिले जात असल्याने अन्य बसेस धूळखात पडून आहेत.
वीजबिल पाठविण्यास ग्राहकांकडून प्रतिसाद
नाशिक : कोरोनामुळे महावितरणकडून मीटर रीडिंग घेतले जात नसल्याने ग्राहकांनी आपल्या वीज मीटरचे रीडिंग स्वत: महावितरणला पाठवावे, असे आवाहन करीत ऑनलाईन यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून नाशिक परिमंडलातील सुमारे ३० हजार ग्राहक महावितरणला आपले स्वत:चे वीज मीटर रीडिंग ऑनलाईन पाठवित आहेत.
एस.टी.च्या कार्गो सेवेला पसंती
नाशिक : कोरोनाच्या संकटकाळात प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने उत्पन्नाचे पर्यायी स्रोत शोधले असून मालवाहू सेवा सुरू केली आहे. या सेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. पहिल्या कोरोनाच्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत महामंडळाच्या कार्गो सुविधेला उद्योजकांकडून मागणी होत आहे.