सिडको : लहान भावाची दारूची सवय सोडविण्याकरता वणी येथे गेलेल्या दोघा भावांच्या दुचाकीला परतीच्या प्रवासात गरवारे पॉइंटजवळ उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी (दि.१७) घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील गोरख लक्ष्मण जाधव (३५) व त्यांचा लहान भाऊ सोमनाथ लक्ष्मण जाधव (२५) हे दोघे त्यांची दुचाकी (एमएच १५, डीपी ४२१४) वरून सोमनाथचे दारूचे व्यसन सोडण्यासाठी वणी येथे औषधोपचार घेण्यासाठी गेले होते. ते वणी येथून परत येत असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला मुंबई -आग्रा महामार्गावर पांडवलेणी, गरवारे पॉईंटजवळ उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की यात दोन्ही भावांचा जागेवरच मृत्यू झाला. जाधव बंधूंच्या पश्चात आई, वडील यांच्यासह पत्नी, दोघांनाही दोन मुली, बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उत्तम सोनवणे करीत आहेत.
170921\17nsk_32_17092021_13.jpg
गोरख जाधव