नाशिक : अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये असलेली गोंधळाची स्थिती, यादीत नावे गायब झाल्याने म्हसरूळ येथे मतदारांनी रास्ता रोको करण्याचा केलेला प्रयत्न आणि काही भागात बोगस मतदानाच्या तक्रारींसह किरकोळ वादविवाद वगळता नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सुमारे ६२ टक्के मतदान झाले, तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ६८ टक्के मतदान झाले. सन २०१२मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतांचा टक्का वाढला. शांततेत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत महापालिकेच्या १२२ जागांसाठी ८२१, तर जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३३६, व १४६ गणांसाठी १०१० उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झाले असून, त्यांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (दि. २३) होणार आहे. नाशिक महापालिकेसाठी मंंगळवारी (दि. २१) सकाळी ७.३० ते ५.३० या काळात मतदानप्रक्रिया राबविण्यात आली. १४०७ केंद्रांवर घेण्यात आलेल्या मतदानासाठी ४५७८ मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी ७७४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी ७.३० वाजता मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत ७.१५ टक्के मतदानाची नोंद झाली. याचवेळी प्रभाग क्रमांक १३, २५ आणि २६ याठिकाणी असलेल्या काही बूथवर मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना घडल्या. परंतु, अर्धा ते पाऊण तासाच्या कालावधीत पुन्हा यंत्रणा सुरळीत होऊन मतदानाच्या प्रक्रियेला वेग आला. दुपारी १.३० वाजेपर्यंत ३०.६३ टक्के मतदानाची नोंद झाली, तर ३.३० वाजेपर्यंत मतांची टक्केवारी ४३.३३वर जाऊन पोहोचली होती. दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर मतदारांनी घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. ंंमहापालिकेसाठी एकूण १० लाख ७३ हजार ४०८ मतदारांपैकी ६ लाख ६१ हजार १९९ मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये ३ लाख ५६ हजार ८५५ पुरूलष तर ३ लाख ४ हजार ३४१ महिलांचा समावेश आहे. या निवडणुकीमध्ये७२ तृतीयपंथी मतदार होते. त्यापैकी अवघ्या तिघांनीच मतदान केले.मतांचा टक्का वाढलासन २०१२ च्या निवडणुकीसाठी १० लाख ३ हजार मतदार होते. त्यापैकी ५ लाख ७३ हजार ५८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी मतदानाची टक्केवारी ५७.१८ टक्के इतकी होती. यंदा महापालिका निवडणुकीसाठी मतांचा टक्का वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मोठ्या प्रमाणावर मतदार जागृती करण्यात आली. मतदार जागृतीसाठी खास आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मिसेस युनिव्हर्स नमिता कोहोक, अभिनेता चिन्मय उद्गीरकर यांची संदेशदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यंदा सुमारे ७० हजार नवमतदारांनी नोंदणी केली होती. त्यामुळे निवडणुकीसाठी १० लाख ७३ हजार ४०७ उमेदवार पात्र होते. त्यात युवा मतदारांचा मतदानासाठी मोठा उत्साह दिसून आला. महापालिकेच्या प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळपर्यंत सुमारे १ हजार मतदान केंद्रांवर सुमारे ५ लाख ८३ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा मतदारांची संख्या वाढतानाचा मतांचा टक्काही वाढल्याचा दावा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी केला. नावे गायब म्हसरूळला रास्ता रोकोनाशकातील अनेक प्रभागात मतदार यादीतील गोंधळाचा फटका मतदारांना बसला. मतदार यादीतून नावे गायब झाल्याने म्हसरूळ येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये वडनगर परिसरातील सुमारे ५०० ते ६०० नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. ‘भालेकर’ला उशिरापर्यंत मतदाननाशकात मतदानाची वेळ संपून गेल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत प्रभाग क्रमांक ३, ४, १२, १३, १४, १५, ३०, २७, २९, ३१, ९ आणि ११ यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू होती. प्रभाग १३ मधील बी.डी. भालेकर हायस्कूलमधील मतदान केंद्रावरही सायंकाळी गर्दी झाल्याने रात्री ८ पर्यंत मतदान घेण्यात आले.मालेगाव तालुक्यात गरबडला गोंधळ जिल्ह्यात एकूण २४ लाख २६ हजार ७८१ मतदार होते, त्यापैकी सुमारे १६ लाख ५० हजार २११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मालेगाव तालुक्यातील गरबड गावातील साडेचारशे मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला, तर बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथील ग्रामस्थांनी काही वेळ बहिष्कार टाकला होता. सिन्नर तालुक्यातील सांगवी येथे पैसे वाटपाची चर्चा होती. मात्र पोलिसांनी त्याबाबत स्पष्ट नकार दिला. जिल्ह्यात सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होते. मात्र सहा तालुक्यांत सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होेते. जिल्ह्णात एकूण २४ लाख २६ हजार ७८१ मतदार होते. त्यापैकी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत १२ लाख ४ हजार ८१७ मतदारांनी मतदान केले.
मतदार जागा झाला!
By admin | Updated: February 22, 2017 02:07 IST