त्र्यंबकेश्वर : तालुक्यात आतापर्यंत सात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच हरसूल ग्रामीण रुग्णालयासह त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात २१ हजार ५२४ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ग्रामीण भागात लोकांचा लस घेण्यास अजिबात प्रतिसाद मिळत नव्हता. पण त्र्यंबकसह हरसूल येथे आता लसीकरणासाठी रांगा लागत आहेत.
अजूनही दुर्गम व आदिवासी तसेच गुजरात सीमेवरील गावातील लोकांवर अशिक्षित पणामुळे अंधश्रद्धा व भगत, बुवाबाजी, भोंदूबाबा यांचा पगडा आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत गैरसमज निर्माण होऊन त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. लसीकरणासाठी जाणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसह आशा कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले. आता मात्र लसीकरणाला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ना सांगत नाही. जा पुढे जा असे म्हणून आरोग्य कर्मचारी, आशावर्कर, अंगणवाडीसेविका यांना अक्षरशः अपमानास्पद वागणूक देत असतात. दरम्यान, आता दुसरी लाट ओसरत असून, सध्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात दोनच बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्र्यंबकेश्वर, हरसूल येथील कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही. या भागात अद्याप म्युकरमायकोसिस तसेच डेल्टा प्लस व्हेरिएंटचा एकही रुग्ण सुदैवाने आढळून आलेला नाही.