रामदास शिंदे पेठसुरगाणा, पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच जपानी तंत्राचा वापर करून शेती करण्याचा प्रयोग करण्यात येणार असून, गावंधपाडा येथे जपानी शेतीतज्ज्ञानी भेट देऊन शेती, मातीचा प्रकार व जलसिंचन व्यवस्थेची पाहणी केली.पेठ, सुरगाणा तालुक्यात मुख्यत्वे भात, नागलीची पिके घेतली जातात. मात्र उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक विकासदर वाढत नाही. अखेर शेतीला रामराम ठोकून येथील शेतकरी देशावर रोजगाराच्या शोधात भटकंती करताना दिसून येतो. सुपीक जमीन व मुबलक पाणी असूनही केवळ तंत्रज्ञानाची माहिती नसल्याने शेतकरी उत्पन्नवाढीपासून वंचित राहत असल्याचे पाहून गावंधपाडा येथील सेंद्रिय शेतीतज्ज्ञ यशवंत महादू गावंढे यांनी स्वत:च्या शेतीत नवनवीन प्रयोग राबवून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली. विविध नगदी पिकांवर सेंद्रिय प्रयोग करून त्यांनी उत्पन वाढीचे मार्ग शोधले. यासाठी त्यांनी जिल्ह्यातील पहिला पुरुष सेंद्रिय शेती बचतगट स्थापन केला. गावंढे यांच्या कृषी कार्याची दखल घेऊन जपानचे शेतीतज्ज्ञ सुगु काजी कावा व गोहितो यांनी गावंधपाडा येथे भेट देऊन शेतजमिनीची पाहणी केली. जपानी पद्धतीने भाजीपाला व फळझाडांची लागवड करून त्याचे तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच अशा प्रकारची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादनासह बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाणार असल्याने आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणार आहे. गावंधपाडा येथे अशा प्रकारची जपानी शेतीचा नमुना व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
पेठला जपानी शेतीचा प्रयोग
By admin | Updated: October 22, 2016 00:17 IST