नाशिक : पेठ तालुक्यातील निमगुडे येथील ग्रामविकास मंडळ संचलित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळेत आरक्षित स्वयंपाकी पदावर अन्य समाजाच्या व्यक्तीच्या उमेदवाराची भरती करून शासन नियमांचा भंग केल्याने तत्काळ प्रकल्प अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती-जमाती शिक्षण, विकास संशोधन संस्थेने आदिवासी विकास आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सदर संस्थेने वृत्तपत्रात जाहिरात देऊन स्वयंपाकी पद भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी राखीव असल्याचे म्हटले होते, प्रत्यक्षात या पदावर अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची भरती करण्यात आली. या भरतीला प्रकल्प अधिकाऱ्यानेही मान्यता दिली. त्यामुळे या भरतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या संपूर्ण घटनेची चौकशी करून संस्थेचे अध्यक्ष, प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच बिंदू नामावलीप्रमाणे सर्व एन. टी. कर्मचाऱ्यांची सूची कार्यालयात लावण्यात यावी, अन्यथा २ आॅक्टोबर पासून आदिवासी विकास आयुक्तालया समोर उपोषण करण्यात येईल, असा इशाराही सरचिटणीस बापू बैरागी यांनी दिला आहे.
ग्रामविकास मंडळात बेकायदा नोकरभरती
By admin | Updated: September 11, 2016 01:37 IST