सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर या दोन्ही मध्यम प्रकल्पांचे जलनियोजन करण्यात आले आहे. यंदा या दोन्ही धरणांमधून रब्बी पिकासाठी पाण्याची दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिले आवर्तन मोसम व आरम नदीपात्रात सोडण्यात आल्याने रब्बीच्या पेरण्यांना आता वेग आला आहे.हरणबारी व केळझर अशी दोन मध्यम प्रकल्प तालुक्याची तहान भागवितात. या दोन्ही प्रकल्पांची क्षमता अनुक्रमे 1११६६ व ५७२ दशलक्ष घनफूट इतकी साठवण क्षमता असून, यंदा दोन्ही धरणे तुडुंब भरून नद्याही अनेक वर्षांनंतर दीर्घकाळ म्हणजे एक ते दीड महिना दुथडी भरून वाहिल्या. यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे साहजिकच रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या. शेतकऱ्यांनी यंदा रब्बीसाठी पाण्याची तीन आवर्तने देण्याची मागणी केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाने जलनियोजनासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत दोन्ही धरणांमधून शेतीसाठी दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला. हरणबारी धरणामधून ११६६ दशलक्ष घनफूट उपलब्ध पाणीसाठ्यापैकी ६०० दशलक्ष घनफूट पाणी, तर केळझरमधून ५७२ पैकी ३६० दशलक्ष घनफूट पाणीसाठा रब्बीसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा विभागाच्या निर्णयानुसार हरणबारीमधून ३०० तर केळझरमधून १६० दलघफू पाणी रब्बीला पहिले आवर्तन म्हणून सोडण्यात आले आहे.
रब्बीसाठी यंदा दोन आवर्तने
By admin | Updated: December 26, 2016 01:47 IST