अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय देण्याबाबतचे पत्र पाठवून इशारा देणेदेखील एक घोडचूकच आहे. औरंगाबाद काही महाराष्ट्राच्या किंवा जगाच्या बाहेर नाही. त्यामुळे कोरोनाची स्थिती काय आहे आणि शासनाकडून केवळ ५० व्यक्तींच्याच कार्यक्रमांना परवानगी आहे, हेदेखील त्यांना ज्ञात असावे, तसेच आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याबाबतही ते अनभिज्ञ असणे अशक्यच आहे. तरीदेखील त्यांनी जुलैअखेरपर्यंत निर्णय घेऊन तो कळविण्याबाबतचा इशारा दिल्याने नक्की त्यांना संमेलन नाशिकला होऊ द्यायचे आहे का? असा विचार कुणाच्याही मनात येणे साहजिकच आहे. किंबहुना असा इशारा देण्यामागे परिस्थितीवश तुम्ही नकार कळवावा म्हणजे पाहुण्याच्याच हातून साप मारुन घेण्यासारखे असल्याची सामान्य रसिकांची भावना झाल्यास त्याला तरी चुकीचे कसे म्हणता येईल. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा गांभिर्याने विचार करता संमेलन दिवाळीपर्यंत तरी आयोजित करताच येऊ शकणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे; मात्र तसे बोलले तरी महामंडळाला हस्तक्षेप करणे सोपे जाईल, ही भीती आयोजकांच्या मनात आहे. त्यामुळे राजाचा पोपट सध्या तरी निपचीत पडलाय, तो काहीच बोलत नाहीये, तो श्वासपण घेत नाहीये, पंखदेखील फडफडवत नाहीये, असे सारे काही बोलले जात आहे; पण मुद्द्याचे, वास्तव आणि खरे, स्पष्ट बोलायची हिंमत कुणाचीच होत नाहीये.
इन्फो
‘डिजिटल’चे पडघम !
साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीच्या बैठकीत सध्या तरी संमेलन आयोजित करण्याबाबत निश्चित तारीख, महिना सांगता येणार नाही, असाच निर्णय कळविण्याचे निश्चित झाले आहे. त्याचबरोबर संमेलनाचे डिजिटल आयोजन करण्याबाबतही विचार करण्याचे सुतोवाच काही मान्यवरांकडून करण्यात आले. त्यामुळे कोरोना काळातील अन्य परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रमांप्रमाणेच संमेलनाचेही ‘डिजिटल आयोजन’ करण्याचे पडघम वाजू लागल्यास नवल वाटू नये.
धनंजय रिसोडकर
----------
लोगो
साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.