लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे धोरण बदलल्याने बहुतांश शिक्षकांना धडकी भरली असून, सुगम व दुर्गम शाळा निश्चित करून दुर्गम भागातील शाळांवर तीन वर्षांहून अधिक काम करणाऱ्यांना सुगम शाळांमध्ये बदली करण्याचे धोरण असल्याने बदलीस पात्र सुजलाम-सुफलाम भागातील शिक्षकांना धडकी भरली आहे. त्यात या बदल्या पूर्णपणे आॅनलाइन पद्धतीने होत असल्याने वशिलेबाजांची पाचावर धारण बसली आहे. शिक्षकांच्या बदल्यांबाबत सातत्याने वशिलेबाजीचा व संघटनांचा बोलबाला होत असल्याचे गृहीत धरून ग्रामविकास व शिक्षण संचालनालयाने शिक्षकांच्या बदल्यांचे सुधारित धोरण राबविले आहे. दुर्गम भागात तीन वर्षांहून अधिक काम करणाऱ्या शिक्षकांना सुजलाम-सुफलाम भागातील म्हणजे ‘सुगम’ शाळांत बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने होत असल्याने शिक्षकांना दुसरा मार्गच राहिला नाही. प्रथम दुर्गम भागातील बदलीस पात्र शिक्षक थेट २० शाळांची यादी आॅनलाइन भरणार आहेत.त्यामुळे सुगम शाळांत दहा वर्षे नोकरी केलेल्या शिक्षकांना दुर्गम भागात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. अतिदुर्गम व दुर्गम भागात आपल्या कुटुंबापासून दूर राहून काम करणाऱ्या शिक्षकांना नव्या निर्णयामुळे आपल्या कुटुंबाच्या सहवासात राहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, सुगम शाळांमध्ये सातत्याने काम करणाऱ्या शिक्षकांना दुर्गम भागात जावे लागणार असल्याने ते सध्या ‘गॅस’वर आहेत. दरम्यान, सुगम, दुर्गम शाळा गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निश्चित व त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत अंतिम करण्यात आल्या आहेत. मात्र, या शाळा निश्चित करताना शिक्षण विभागापुढेही अडचणी वाढल्या आहेत. काही शाळा सपाटीवर असतात मात्र त्या गावांत एसटी जात नसेल तर ती शाळा दुर्गम की सुगम, असे कोडेही पडत आहे. नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ३३० शाळांपैकी सुमारे ६९२ शाळा दुर्गम (अवघड क्षेत्रातील) ठरल्या आहेत.
शिक्षकांच्या बदल्या आता ‘आॅनलाइन’
By admin | Updated: May 11, 2017 00:15 IST