नाशिक- गेल्या काही दिवसांपासून भाजपत अस्वस्थ असणारे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि सुनील बागुल हे दाेघे त्यांच्या मूळ स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा असली तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. सुनील बागुल गुजरातच्या धरतीवर असून तेथून परतल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे सांगितले. तर गुरूवारी (दि.७) शिवसेना नेते खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येणार असून गिते यांच्या प्रवेशाबाबत त्यांच्याशी चर्चा होणार असल्याचे समजते.दरम्यान, भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी या दोन्ही नेत्यांच्या अन्य पक्षात जाण्याचा इरादा असल्याचा इन्कार केला आहे. गिते आणि बागुल हे दोघेही हाडाचे शिवसैनिक असले तरी सध्या दोघेही भाजपत आहेत. यात त्यांच्या दोघांच्या कुटुंबीयांना अनुक्रमे उपमहापौरपद मिळाले असले तरी त्यांना स्वत:ला अपेक्षित पदे मिळाली नसल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून गिते उमेदवारी करणार असल्याची देखील चर्चा होती. मात्र, त्यानंतरही हा विषय मागे पडला. परंतु तेव्हापासून गिते हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सुनील बागुल यांच्या बाबतीत देखील अशाच प्रकारे चर्चा सुरू आहे. उभयतांनी आपल्याला अन्य पक्षाच्या ऑफर्स असल्याचे सांगून योग्य तो निर्णय घेण्याचे जाहीर केल्याने भाजपात ते फार समाधानी नाहीत अशाच चर्चांना पुष्टी मिळत गेली.
सध्या निवडणुकीचे वारे असल्याने भाजपाला डॅमेज करण्यास शिवसेना उत्सुक असून त्या दृष्टीने शिवसेनेतही त्यांच्या आगमनासाठी एक गट उत्साहात आहे. त्यातच गुरूवारी (दि.७) शिवसेना नेते खासदार संजय राऊत लोकार्पण आणि अन्य कामांसाठी नाशिकमध्ये येत असून त्यांच्या दौऱ्यात अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे.
कोट...
मी कामानिमित्त गुजरातला आलो असून तेथून परतल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. शिवसेनेकडून ऑफर आहे हे खरे आहे. मात्र, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ.
- सुनील बागुल, माजी प्रदेश उपाध्यक्ष भाजप
कोट...
गिते आणि बागुल हे पक्षाचे आदरणीय नेते असून ते पक्ष सोडतील असे वाटत नाही. त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा निराधार आहे.
गिरीश पालवे, शहराध्यक्ष, भाजप