प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कामकाजाची पद्धत कृतीवर अवलंबून असून, कागदावर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून वर्षानुवर्षे पदांवर ठाण मांडून बसणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची यापूर्वी त्यांनी सुटी केली आहे. ज्या ठिकाणी दौऱ्यावर येतात तेथील कार्यकारिणीची यादीच ते सोबत बाळगतात व बैठकीला गैरहजर असलेल्या कार्यकर्ता, पदाधिकाऱ्याला स्वत:च फोन लावून तो पक्षात असल्याची खात्री करतात. असा प्रकार पाटील यांनी यापूर्वी काही जिल्ह्यांमध्ये केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यावर तशी नामुष्की कोसळू नये म्हणून त्याची खबरदारी घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत प्राथमिक अंदाज व तयारी जाणून घेण्यात आली आहे. पाटील हे जवळपास वर्ष-दीड वर्षानंतर नाशिकच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे त्यांच्या दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी करायची किंवा नाही याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:16 IST