ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळील टेंभूरवाडी (आशापूर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. यामुळे शेतकºयांमध्ये दहशत निर्माण झाली असून, वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.टेंभूरवाडी येथील आनंदा सावळेराम पाटोळे यांनी त्यांच्या शेतात गुरुवारी (दि. ३१) सकाळी जर्शी गाय, वासरू व अन्य जनावरे चरण्यासाठी बांधलेली होती. सायंकाळी ५ वाजता पाटोळे यांचा मुलगा शांताराम जनावरे घरी आणण्यासाठी गेला असता वंजारदरा भागात बिबट्याने जर्शी गाईला सुमारे दीडशे फूट ओढत नेले. शांताराम यांच्या सदर प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत बिबट्याने गायीचा फडशा पाडला होता. बिबट्याला हुसकावून लावले; पण जर्शी गायला ठार केल्याने बाकीचे जनावरे बिबट्याच्या भीतीने इतरत्र पळत होते. पाटोळे याचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून वंजारदरा भागात बिबट्याची दहशत होती; पण कोणतीही घटना घडली नसल्याने शेतकरी बिनधास्त होते. बिबट्याच्या भरदिवसा दर्शन देत असल्याने शेतमजूर या भागात भीतीमुळे जाण्यास तयार होत नाही. वंजारदरा भागात वनविभागाच्या वतीने घटनास्थळी वनरक्षक तानाजी भुजबळ यांनी भेट देऊन पंचनामा केला.
बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:08 IST