नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून शासनाच्या ‘महाआॅनलाइन’ सॉफ्टवेअरच्या सर्व्हरमध्ये निर्माण झालेला तांत्रिक दोष दूर करण्यात यंत्रणेला अपयश आले असून, अतिशय धिम्या गतीने चालणाऱ्या या सर्व्हरमुळे सेतू चालक व महा-ई-सेवा केंद्रचालक मेटाकुटीस आले आहेत. दिवसभरातून पंधरा ते वीस दाखले तयार होत असल्यामुळे हजारोंच्या संख्येने दाखल अर्जांचा निपटारा करण्यात अडचणीत येत असल्याने नागरिकही दाखल्यांसाठी त्रस्त झाले आहेत. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गंत महा आॅनलाइनने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्येच विविध शासकीय दाखले तयार करावे लागत आहेत. सध्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थी, पालकांकडून उत्पन्न, नॉनक्रिमीलेअर, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व, जातींच्या दाखल्यांसाठी दिवसाकाठी शेकडो अर्ज सेतू केंद्र तसेच गावोगावच्या महा-ई-सेवा केंद्रचालकांकडे सादर केले जात असून, शासनाच्या नियमानुसार आठ दिवसांच्या आत अर्जदारास दाखला देणे बंधनकारक असले तरी, गेल्या आठ दिवसांपासून महाआॅनलाइनची यंत्रणा कोलमडून पडली असून, गेल्या आठवड्यात सलग चार दिवस कामकाज ठप्प करणाऱ्या या सर्व्हरमध्ये राज्यपातळीवरच तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे सांगण्यात येऊन युद्धपातळीवर काम सुरू असल्याचा दावा केला गेला, परंतु आठवडा उलटूनही दोष पूर्णपणे दूर झालेला नाही. त्यामुळे दिवसाकाठी जेमतेम पंधरा ते वीस दाखले होत असून, रविवार व सोमवारच्या सुटीनंतर नागरिकांनी सकाळी सेतू कार्यालयात गर्दी केली; मात्र दाखले तयार नसल्याचे पाहून त्यांचा संताप झाला. त्यातून सेतूचालक व नागरिकांमध्ये वादही झडले आहेत. सध्या दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी होत असून, दिवसाकाठी शेकडो अर्ज दाखल होत आहेत, त्यामानाने दाखल्यांचा निपटारा धिम्या गतीने होत आहे. सर्व्हर डाउन तसेच सॉफ्टवेअरच्या तांत्रिक दोषामुळे सेतू केंद्रातील कर्मचारीही हातावर हात ठेवून बसून आहेत.
सर्व्हर डाउनमुळे दाखल्यांचा प्रश्न कायम
By admin | Updated: May 2, 2017 18:12 IST